स्टॅम्प ड्युटी कमी करावी

घराची मागणी वाढण्यासाठी राज्यांना पारेख यांचे आवाहन

मुंबई – मंदीने ग्रासलेल्या रिऍल्टी क्षेत्राचे पुनरुज्जीवन शक्‍य तितक्‍या लवकर होण्याची गरज आहे. कारण या क्षेत्रावर इतर अनेक क्षेत्रे अवलंबून असतात. सध्याच्या परिस्थितीत विकसकांनी घराचे दर कमी पातळीवर ठेवले आहेत. राज्यांनी पुढाकार घेऊन मर्यादित काळासाठी स्टॅम्प ड्युटी कमी करावी, असे आवाहन ज्येष्ठ बॅंकर दीपक पारेख यांनी केले आहे.

मंदी कितीही गडद असली तरी प्रत्येकाला राहायला घर लागते. त्यामुळे घरांच्या मागणीवर जास्त काळ परिणाम होऊ शकत नाहीत.सध्याच्या परिस्थितीत लोकांना तयार घरे हवी आहेत. राज्य सरकारने मर्यादित काळासाठी स्टॅम्प ड्युटी कमी केली तर नागरिकांना तयार घरे विकत घेण्यासाठी चालना मिळू शकेल, असे पारेख म्हणाले. रिझर्व्ह बॅंकेचे व्याजदर सध्या बऱ्याच खालच्या पातळीवर आहेत.

घरासाठीचे कर्जाचे व्याजदर बॅंकांनी कमी केले आहेत. मात्र, तरीही घरांची मागणी पुरेशा वेगाने वाढत नाही याबद्दल चिंता व्यक्‍त केली जात आहे. एचडीएफसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना पारेख म्हणाले की, सर्वांनी मिळून यातून मार्ग काढण्याची गरज आहे. ग्रामीण भागावर लॉकडाऊनचा फारसा परिणाम झालेला नाही. आगामी तेजीचे नेतृत्व भारतातील शेती आणि ग्रामीण भाग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यावसायिक जागेची मागणी कमी नाही
लॉकडाऊनच्या काळात बड्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा यशस्वी प्रयोग केला आहे. आगामी काळात या कंपन्या वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे व्यावसायिक जागांसाठीची मागणी कमी होईल, असे बोलले जात आहे. मात्र, पारेख यांनी हा गैरसमज असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये भारतातील मोठ्या कंपन्यांनी व्यावसायिक जागांसाठीचे व्यवहार वाढविले असल्याचे सांगितले आहे. गोडाऊन, ई-कॉमर्स, क्‍लाऊड, डेटासेंटर इत्यादी नव्या उद्योगांसाठी मागणी वाढणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.