मुंबई: करोना पेशंटसाठी वरदान ठरणाऱ्या रेमंडेसिवीर आणि टोसीलिझम औषधांचा मुंबईसह राज्यात तुटवडा निर्माण झालेला आहे. या औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडत आहे. तर काही ठिकाणी या औषधाचा काळाबाजार होत आहे. ही परिस्थिती समोर आल्यानंतर राज्य सरकारने देखील याची गंभीर दखल घेत काही वितरकांवर कारवाई करत आहे.
करोनाबाधित रुग्णांना उपचार देत असताना यामध्ये रेमंडेसिवीर आणि टोसीलिझम या औषधांचा वापर केला जात आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो रुग्णालयातून या रुग्णांच्या नातेवाईकांकडे या औषधांच्या प्रिस्क्रीप्शन्स डॉक्टर देत आहेत. हे औषध मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक माहिती मिळेल त्या दिशेने जाऊन इंजेक्शन आणि औषध मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
घाटकोपर परिसरातील एक डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडेही इंजेक्शन आणि औषधे मिळत असल्यामुळे नातेवाईकांनी या परिसरात एकच गर्दी करत आहे. रेमंडेसिवीर या इंजेक्शनची किंमत 4 हजार रुपये आहे. तर टोसीलिझम या औषधाची किंमत तब्बल 40 हजार रुपये आहे. मात्र या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मुंबईतल्या अनेक ठिकाणी औषधांचा काळा बाजार करण्यात येत आहे. यांची किंमत तब्बल तीन ते चार पटीने वाढलेली आहे.
सध्या राज्यातील अनेक ठिकाणी करोना रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे या औषधाची मागणी वाढलेली आहे. अनेक नागरिकांना तासंतास रांगेत उभारल्यानंतर ही औषधे मिळत आहेत. अनेक गरीब रुग्णांचे नातेवाईक मात्र या औषधाची किंमत बघूनच पुन्हा परत माघारी फिरत आहेत. ही औषधे वेळेत न मिळाल्यामुळे अनेक रुग्ण दगावले सुद्धा आहेत.
औषधासाठी आधारकार्ड सक्तीचं
रेमडेसिवीर औषधासाठी आधारकार्ड सक्तीचं करण्याच्या सूचना मुंबई शहराचे पालकमंत्री आणि मंत्री अस्लम शेख यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांना केल्या आहेत. रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अस्लम शेख म्हणाले, यापुढे रेमडिसिवीर औषधासाठी रुग्णांना आधारकार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ज्या रुग्णांना रेमडेसिवीर औषधाचा डोस देण्यात आला आहे त्या रुग्णांची नोंद त्यांच्या आधारकार्डसह ठेवणंही रुग्णालयांना बंधनकारक असेल. तसं न झाल्यास त्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे शेख यांनी सांगितले.