आणखी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; आजपर्यंत 59 जणांना बाधा
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे सध्या करोनाचा ग्रामीण भागात फैलाव वाढला आहे. सातारा तालुक्यातील जिहे या गावात शनिवारी रात्री आणखी आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकट्या जिहे गावातील करोनाबाधितांची संख्या 59 वर जाऊन पोहोचली असून जिहे येथील करोनाची साखळी तुटता तुटेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सातारा तालुक्यातील जिहे गावात रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 2 जुलैच्या रिपोर्टनुसार 19 रुग्णांची भर पडल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली होती. एक, दोन असे रुग्ण वाढत असतानाच बुधवारी आणखी 16 बाधितांची भर पडली होती. गुरुवारी रात्री आलेल्या अहवालानुसार आणखी सात बाधित वाढले आहेत. शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालात दोन रुग्णांची भर पडली होती त्यामुळे रुग्ण संख्या 51 वर पोहोचली होती. त्यात आणखी आठ जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने जिहे येथील करोनाबाधित रुग्णांची संख्या 59 वर जाऊन पोहोचली आहे.
तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. जी. पवार, आरोग्य कर्मचारी गावास भेट देवून उपाययोजनांचा आढावा घेतला. वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करूम संपूर्ण गावात आरोग्य विभागामार्फत तपासणी मोहीम राबवण्यात आली. शुक्रवारी दिवसभर गावात सर्व्हे करण्यात आला होता. यावेळी नागरिकांची थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. शुक्रवारी दिवसभरात गावात 20 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. शनिवारी आलेल्या रिपोर्टनुसार आणखी आठ बाधित वाढले आहेत. यामध्ये तीन पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. जिहे गावातील करोनाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रसासनासमोर आहे.