पॅरिस -संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या करोना फैलावाचे संकट अद्याप कायम आहे. करोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात घेतलेल्या बळींची संख्या आता 6 लाखांवर पोहोचली आहे.
जगातील 213 देश आणि भूप्रदेशांना करोना संकटाने ग्रासले आहे. जगभरात शुक्रवारी 2 लाख 37 हजारांहून अधिक नवे करोनाबाधित आढळले. तो एकाच दिवसातील उच्चांक ठरला. त्यापाठोपाठ शनिवारी जगभरातील करोनाबळींच्या संख्येने 6 लाखांचा टप्पा ओलांडला. संपूर्ण जगात सध्या 1 कोटी 42 लाखांहून अधिक बाधित आहेत.
करोना संकटाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. त्या देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद झाली आहे. अमेरिकेत सुमारे 37 लाख 72 हजार बाधित आहेत. त्या देशात करोना संसर्गामुळे आतापर्यंत 1 लाख 42 हजार बाधित दगावले आहेत. बाधित आणि बळींच्या संख्येतील जागतिक क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या स्थानी आहे. त्या देशात 20 लाखांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. ब्राझीलमध्ये सुमारे 78 हजार बाधित मृत्युमुखी पडले आहेत.
बाधित संख्येत भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. भारताचे शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशातील करोना संकटही गहिरे बनले आहे. जागतिक क्रमवारीत ते देश अनुक्रमे 12 व्या आणि 17 व्या स्थानी आहेत. पाकिस्तानात 2 लाख 61 हजारांहून अधिक बाधित आहेत. बांगलादेशनेही 2 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
पाकिस्तानात 5 हजार 522 तर बांगलादेशात 2 हजार 581 बाधित मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, जगभरातील 85 लाखांहून अधिक बाधित आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.