दुबई – जगभरात करोनाने थैमान घातले असून करोनावरील लसीवर जगभरात संशोधन सुरू आहे. काही देशांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात यशही मिळाले आहे. परंतु अशातच आणखी दिलासादायकबाब म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये करोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झालेली ही जगातील पहिलीच लस आहे.
ही लस दुबईमधील दी 42 हेल्थकेअर आणि चीनमधील मोठी लस निर्मिती करणारी कंपनी सिनोफार्म यांनी एकत्रितरित्या तयार केली आहे. सध्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार संयुक्त अरब अमिरातीमधील नागरिकांसहित प्रवाशांना ही लस देण्यात आली.
नोंदणी करण्यात आलेल्या 15 हजार जणांना गुरुवारी अबू धाबीमधील एक आरोग्य केंद्र शेख खलिफा मेडिकल सिटीमध्ये ही लस दिली. ज्या ठिकाणी संक्रमणाची संख्या अधिक असते त्या ठिकाणी त्या लसीचा प्रभाव पाहण्यासाठी वैद्यकीय चाचण्या लवकर घेतल्या जात असल्याची माहिती चीनमधील तज्ज्ञ ताओ लीना यांनी सांगितले.
जी-42ने जारी केलेल्या निवेदनानुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या आरोग्य विभागाचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन मोहम्मद अल हमीद हे या लसीच्या चाचणीत भाग घेणाऱ्या पहिल्या काही व्यक्तींपैकी एक होते. संयुक्त अरब अमिरातीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी चीनद्वारे विकसित करत असलेल्या लसींवर विश्वास आणि चीनसोबत सहयोगाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून महामारीला दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.