कोल्हापूर – संपूर्ण जगाला ग्रासलेल्या “कोविड-19′ अर्थात करोना विषाणूला निष्क्रिय करू शकणारे महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक संशोधन येथील शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोफॅब्रिक्स सेंटरच्या संशोधकांनी केले आहे. “व्हायरस कवच’ या फॅब्रिक स्प्रे (कपड्यांवर मारावयाचा फवारा) तंत्रज्ञानामुळे करोना व्हायरससह अन्य अनेक घातक विषाणूंना निष्क्रिय करणे शक्य होणार आहे, ही माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.
विद्यापीठात आज सकाळी नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. किरणकुमार शर्मा या संशोधकांसह या उत्पादनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुणे येथील इकोसायन्स इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत म्हेतर, संचालक अजय म्हेतर यांनी या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल माहिती दिली.
“व्हायरस कवच’ तंत्रज्ञानाच्या प्रभावाने कोविड-19 विषाणू 99.99 टक्क्यांपेक्षाही अधिक निष्क्रिय झाल्याचे आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये दिसून आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ नॅनोफॅब्रिक्सचे प्रा. किरणकुमार शर्मा यांनी प्रा. पी. एस. पाटील आणि डॉ. किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातील संशोधन केले आहे.
व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे तंत्रज्ञान हे वापरावयास अत्यंत सुलभ व सोपे आहे. हा स्प्रे फक्त आपल्या कपड्यांवर फवारायचा आहे. वाळल्यानंतर पुढे तो कपडे धुवून टाकेपर्यंत आपल्याभोवती संरक्षक कवचाप्रमाणे ते काम करते. कपडे धुतल्यानंतर पुन्हा त्यावर हे फवारावे. यामध्ये केवळ सेंद्रिय कार्बोक्झिलिक ऍसिडची संयुगे आहेत जी अजिबात विषारी नसून पर्यावरणपूरक आहेत, असा दाखला अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा एजन्सीने दिला आहे. त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यताही दिलेली आहे.
“व्हायरस कवच’ या उत्पादनाच्या देशासह जगातील आघाडीच्या प्रयोगशाळांत चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विविध घातक विषाणूंना निष्क्रिय करण्याच्या त्याच्या गुणधर्मावर शिक्कामोर्तब झाले आहे. याचे अँटिमायक्रोबायल गुणधर्म तपासण्यासाठी व्हायरस कवच फवारलेल्या कपड्याच्या पृष्ठभागावर ग्राम-पॉझिटिव्ह प्रकारांतील (स्टॅफिलोकोकस ऑरेयस) आणि ग्राम-निगेटिव्ह प्रकारांतील (इशेरिषिया कोलाय) जीवाणूंचा सुमारे 15 मिनिटे संपर्क आला असता ती 99.99 टक्क्यांहूनही अधिक निष्क्रिय झाल्याचे आढळून आले.
त्याचप्रमाणे या स्प्रेच्या अँटिव्हायरल गुणधर्मांची तपासणी अमेरिकेतील बायोसेफ्टी लेव्हल-4 प्रयोगशाळेत करण्यात आली. या ठिकाणी “व्हायरस कवच’ फवारलेल्या कपड्यांवर सार्स-कोव्ह-2 हा “कोविड-19′ साथीला जबाबदार असलेला विषाणूसुद्धा 99.99 टक्क्यांहून अधिक निष्क्रिय झाल्याचे आढळून आले आहे.