नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न करण्यात येत आहेत.परंतु, काही केल्या कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यातच जगभरात कोरोना रुग्णांची संख्या आता पाच कोटींच्या वर पोहोचली आहे. रोज जगभरात पाच लाखांजवळ कोरोना रुग्ण समोर येत आहेत.
आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात 12 लाख 61 हजार बळी गेले आहेत. मागील 24 तासात 4.69 लाख नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर 5762 लोकांचा मृत्यू मागील 24 तासात झाला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत असून त्यानंतर भारत फ्रांस, इटली, पोलांड, ब्रिटेन, रशियामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत 5 कोटी 7 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 3 कोटी 57 लाख रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात 12 लाख 61 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 1 कोटी 36 लाखांवर पोहोचली आहे.
कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रकोप हा अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेत मागील 24 तासात एक लाख एक हजार नवीन केसेस समोर आल्यात. तर भारतात आतापर्यंत 85 लाखांहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. मागील 24 तासात भारतात 46 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. तिसऱ्या ब्राझील असून तिथं मागील 24 तासात 10 हजार नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत.