अबब…इतके? पुणे पालिकेच्या हेल्पलाइनवर कॉलची संख्या वाढली

पुणे  – शहरातील बाधितांच्या संख्येबरोबरच आता उपचारासाठी बेड कोठे उपलब्ध आहे, याची विचारणा करणाऱ्या कॉल्सच्या संख्येतही वाढ झाली आहे. दिवसाचे कॉल्स आता 20 वरून 200 झाले आहेत. शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, पुणे महापालिकेच्या “कोविड-19 वॉर रुम’च्या हेल्पलाइनवर रुग्णालयातील बेडच्या उपलब्धतेबाबत विचारणा करणारे कॉलचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. या हेल्पलाइनवर आता दिवसाला दोनशेहून अधिक कॉल येत असून, त्यामध्ये ऑक्सिजनयुक्त खाटांच्या उपलब्धतेबाबत सर्वाधिक विचारणा होत असल्याचे निरीक्षण “कोविड-19 वॉर रुम’चे संचालन करणाऱ्या डॉक्टरांनी नोंदवले आहे.

 

 

शहरात करोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून, सक्रिय रुग्णांच्या संख्येने 23 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अत्यवस्थ रुग्णांची संख्याही पाचशेच्या वर गेली असून, ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्याही साडेनऊशेच्या घरात आहे. महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयातील करोनाबाधितांसाठीचे आरक्षित बेड भरत चालले आहेत. त्यामुळे खाटा मिळवण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे.

 

 

करोनाबाधितांना उपचारांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महापालिकेने “कोविड-19 वॉर रुम’ उभारले आहे. करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान या “वॉर रुम’च्या माध्यमातून महापालिकेने अनेक रुग्णांना बेड मिळवून दिले होते. करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर या हेल्पलाइनवरील कॉलची संख्या कमी म्हणजे दिवसाला सुमारे 20 इतकी झाली होती. मात्र, आता पुन्हा त्याचे प्रमाण वाढले आहे.

 

 

दिवसभरात तीन शिफ्टमध्ये या “वॉर रुम’चे काम चालते. मागीलवर्षी करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी “वॉर रुम’च्या हेल्पलाइनवर सहा तासांच्या एका “शिफ्ट’ मध्ये सुमारे साडेचारशे कॉल यायचे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर दिवसभरात तीस ते पन्नास कॉल यायचे, हे कॉल्स अगदी 20 पर्यंत गेले होते. मात्र, आता दिवसभरातील कॉलची संख्या दोनशेच्या वर पोहोचली आहे. त्यामध्ये ऑक्सिजनयुक्त बेडच्या उपलब्धतेबाबत विचारणा करणारे कॉल सर्वाधिक आहेत. आता जम्बो रुग्णालय सुरू झाले आहे, तसेच विविध ठिकाणची कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयातील खाटाही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रुग्णांना खाटा उपलब्ध करून देण्यास मदत मिळेल, असे मत “वॉर रुम’मधील डॉक्टरांचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.