पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. तसेच रोज रुग्ण करोनामुक्त होत असल्याने आता शहरातील एकूण सक्रिय उपचाराधीन रुग्णांची संख्या तीन हजारांहून कमी झाली आहे. आज शहरात नवीन 221 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 335 जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच 19 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
मंगळवारी (दि. 8) शहरात 221 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 52 हजार 664 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 19 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 11 व शहराबाहेरील 8 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील 4184 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 335 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 45 हजार 540 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3779 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 1834 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1106 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 2940 इतकी आहे.