इस्लामाबाद – प्रवासी व्हॅन नदीत कोसळून झालेल्या अपघातात किमान 17 जणांमा मृत्यू झाल्याची घटना पाकिस्तानातील खैबर पख्तुन्वा प्रांतात आज घडली. ही व्हॅन मिलास येथून रावळपिंडीकडे चालली होती. कोहिस्तान जिल्ह्यातल्या पानिबा भागात सिंधू नदीमध्ये ही व्हॅन पडली.
या व्हॅनमध्ये चालकासह एकूण 17 जण होते. एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ही व्हॅन सिंधू नदीत पडली आणि लगेचच पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडाली. या दुर्धटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
बचाव दल बेपत्ता झालेल्या प्रवाश्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते पण नदीचा तीव्र प्रवाह आणि खोली यामुळे त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. देशाच्या उत्तरेकडील प्रदेशांना जोडणारे रस्ते काही धोकादायक पर्वतांवरुन जातात आणि त्यामुळे या भागात वारंवार अपघात घडतात.