पुणे – मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुढील तीन दिवसांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हवामान ढगाळ राहणार असल्याने थंडीचा जोरही कमी राहणार आहे.
अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ येत्या चोवीस तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल तर, काही भागांत तुरळक स्वरुपाचा पाऊस पडेल. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. या ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब होऊन उकाडा वाढला आहे.
दरम्यान, रविवारी राज्याच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते. वाशिम येथे राज्यातील निचांकी किमान तापमान 15.7 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तसेच, पुण्यातही तापमानाचा पारा 17.5 अंश सेल्सिअस इतका नोंदविला गेला.