पंधरा दिवसांचा अवधी वाढविला; 15 डिसेंबर नंतर फास्टॅगची सक्ती
पिंपरी – टोलनाक्यांवर फास्टॅग बंधनकारक केला असला तरी सध्या त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे वाहन चालकांकडून या योजनेला सध्या थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर शासनाने फास्टॅग बंधनकारक केला आहे. 1 डिसेंबरपासून फास्टॅगची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र त्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही वाहन चालकांचे फास्टॅगकडे दूर्लक्षच पहायला मिळत आहे.
फास्टॅग असलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र रांगा असणार आहेत. मात्र या रांगेत इतर वाहन चालकांनी घुसखोरी केल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल वसुली करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र दुप्पट टोलबाबत अद्याप शासकीय पातळीवरून कोणतेही आदेश न आल्यामुळे ही केवळ चर्चा की दुप्पट टोल वसुली होणार याबाबत अद्यापपर्यंत काहीही स्पष्ट झालेले नाही. फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी टोलनाक्यावर फक्त एकच रांग ठेवण्यात येणार आहे. यामुळे टोलनाक्यावर फास्टॅग नसलेल्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागण्याची शक्यता आहे.
काय आहे फास्टॅग?
एका टॅगवर चीप लावलेली असते. हा टॅग पुढील काचेवर लावणे आवश्यक आहे. मोबाइल रिचार्जप्रमाणे फास्टॅग रिचार्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन माध्यमातून, बॅंकेतून खाते उघडून त्यातून फास्टॅग रिचार्ज करता येणार आहे.
खासगी बॅंकांकडून अफवांमध्ये भर
आपल्याच बॅंकेमध्ये वाहनधारकाने खाते उघडावे यासाठी खासगी बॅंकांमध्ये फास्टॅगवरून स्पर्धा रंगली आहे. वाहनधारकांना खाते उघडण्यासाठी पाच ते दहा हजारांची डिपॉझिट रक्कम घेतले जात असल्याचेही प्रकार समोर येऊ लागले आहेत. केवळ सातशे रुपयांमध्येही फास्टॅग लावून घेता येत असतानाही वाहनधारकांमध्ये गैरसमज निर्माण केले जात असल्याचे बोलले जात आहे. वाहनधारकांसाठी टोल नाक्यांवरच फास्टॅग खरेदीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
काय फायदे आहेत फास्टॅगचे?
टोलनाक्यावर तासन्तास थांबण्याची गरज नाही
फास्टॅगच्या वाहनांकरिता खास लेन उपलब्ध
वेळ आणि इंधनाच्या बचतीसोबतच प्रदूषणातही घट होणार
फास्टॅग ऑनलाइन रिचार्ज करता येणार
फास्टॅग आवश्यक कागदपत्रे
वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड
वाहन मालकाचे जन्मतारीख नोंद असलेले ओळखपत्र