कराड – बुधवारपासून सुरु असलेली प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम गुरूवारी दुसऱ्या दिवशीही तितक्याच ताकतीने सुरू झाली. कोल्हापूर नाका येथून या मोहिमेस सुरुवात झाली. रस्त्यालगतची अतिक्रमणे व होर्डिंग मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त करण्यात आली. बुधवारची कारवाई पाहिल्याने गुरूवारी पालिकेची कारवाई करण्याच्या आधीच काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली होती.आजही मोठा पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू होती.
गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहर बकाल झाले होते. अस्ताव्यस्त व मनमानी करून उभारलेल्या अतिक्रमणाची झळ शहरवासीयांना बसत होती. जनतेतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. जनतेच्या भूमिकेची दखल घेत व शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पालिका सरसावली आणि पोलिसांच्या मदतीने वर्षानुवर्षांच्या अतिक्रमणांवर हातोडा घालण्यास सुरुवात केली. कालच्या अतिक्रमण मोहिमेमुळे शहरासह तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष करून कराड शहरातील नागरिक आनंदी झाले आहेत.
कालच्या मोहिमेनंतर आज पुन्हा एकदा अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेने सकाळी सुरुवात केली. शाहू चौकात असलेले मोठे होर्डिंग गॅस कटरने कट करून ते जमीनदोस्त करण्यात आले. बुधवारी पोपटभाई चौकात अतिक्रमण करणाऱ्या काही व्यापाऱ्यांना ते काढून घेण्यास सांगितले होते, मात्र व्यापाऱ्यांनी याला प्रतिसाद न दिल्याने त्या दुकानांवर जेसीबी चालवण्यात आला.
शाहू चौकात एक गॅरेजवर धोकादायक लावलेले फ्लेक्सही पाडण्यात आले. तसेच तेथील काही दुकानाच्या छतावरील पत्रे हे रस्त्यात येत असल्याने तेही पाडण्यात आले. दत्त चौकात अनधिकृत उभे केलेले पत्र्याचे शेड, टप्प्यांवरील शेड तसेच अनधिकृत कट्टे फोडण्यात आले. जसजशी ही अतिक्रमण मोहीम पुढे निघाली तसतसे आपल्या दुकानाच्या पुढील अतिक्रमण स्वतःहून काढण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली होती.
त्यानंतर ही मोहीम बसस्थानकामार्गे विजयदिवस चौकात पोहोचली. यशवंतराव चव्हाण स्मृती सदनाजवळ असलेल्या दुकानांच्या बाहेरील अनधिकृत फलक, खांब, पत्रे जेसीबीने काढण्यात आले. त्यानंतर ही मोहीम रात्री उशिरापर्यंत कृष्णा नाक्यापर्यंत सुरू होती.
दरम्यान अजून दोन दिवस ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. ज्यांचे अतिक्रमण अजूनही जैसे थे आहेत त्यांनी ते स्वतः काढून घ्यावेत, अन्यथा त्यावर जेसीबी फिरवला जाईल. होणाऱ्या नुकसानीस आपण स्वत: जबाबदार असाल अशा सूचना पालिकेतील अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.