मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले आणि ऐनवेळी भाजपासोबत जाऊन पंचायत समित्यांमध्ये आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. जयंत पाटील यांनी मी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला होता हे मान्य केले आहे. त्यांना भाजपसोबत जायचे आहे हे त्यांनी अगोदरच सांगितले असते तर आम्हाला काही अडचण नव्हती, पण आम्हाला अंधारात ठेवून भाजपसोबत हात मिळवणी केली याचे दुःख आहे, अशी खंत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलून दाखवली.
राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवालही पटोले यांनी केला आहे. तसेच, माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे. आम्ही जे काही करतो ते खुलेआम करतो. कॉंग्रेस पक्ष देशाच्या विकासाची आणि विचारांची लढाई लढत आहे, आम्ही परिणामाची चिंता करत नाही, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मी सातत्याने संपर्क साधला आणि भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा केली. प्रामाणिकपणे मैत्री करणे आणि मैत्री निभावणे ही कॉंग्रेसची भूमिका आहे. आम्ही कायमच आघाडी धर्म पाळला आहे. आम्ही समोरून लढतो पाठीमागून वार करत नाही. माझ्यावर टीका करणाऱ्यांची पार्श्वभूमी सर्वांना माहित आहे.
त्याबाबत मी काही बोलण्याची गरज नाही. गेली अडीच वर्ष सत्तेत सोबत राहून राष्ट्रवादीने आम्हाला कशी वागणूक दिली या संदर्भात मी पक्षश्रेष्ठींना अवगत करणार आहे. दगाफटका खपवून घेणार नाही. आम्ही कधीही सत्तेसाठी लांगूनचालन केले नाही, असेही पटोले यांनी सांगितले.