शिरवळच्या कबुलेंना अध्यक्षपद, विधातेंना आश्चर्यकारकरित्या उपाध्यक्षपद
संतोष पवार
सातारा – जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने समतोल राखत शिरवळच्या उदय कबुले यांना अध्यक्षपदी आणि खटावच्या प्रदीप विधाते यांना उपाध्यक्षपदी संधी दिली. आ. मकरंद पाटील यांना मंत्रिपद नाकारल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी दिग्गजांना डावलून ऐनवेळी कबुले यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदाच्या शर्यतीतही अनेक दिग्गज असताना माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा मतदारसंघ मजबूत करण्यासाठी विधाते यांना आश्चर्यकारकरित्या संधी देण्यात आली. या निवडीवरून राष्ट्रवादीत उघडपणे कोणी नाराजी व्यक्त केली नसली तरी अंतर्गत नाराजीचा सूर उमटत आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असून पहिल्या अडीच वर्षांसाठी संजीवराजे नाईक निंबाळकर यांना अध्यक्षपद तर जावळीच्या वसंतराव मानकुमरे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले.
संजीवराजे यांनी सत्ताधारी व विरोधी सदस्यांना विश्वासात घेत स्वच्छ व पारदर्शक कारभार केला. अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन विकासाचा पायंडा त्यांनी पाडला. आपल्या कार्यकाळात संजीवराजे यांनी विविध विभागांच्या कामकाजात सुधारणा केल्या. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यावर संजीवराजेंना पुन्हा संधी द्यावी, अशी मागणी जोर होत होती. त्याचबरोबर मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, दीपक पवार, उदय कबुले हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही संजीवराजेंना पुन्हा अध्यक्षपद देण्यास बहुतांश सदस्यांनी सहमती दर्शवली होती.
कराड उत्तरच्या बाळासाहेब पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याने मानसिंगराव जगदाळे यांचे नाव काहीसे मागे पडले होते. त्यामुळे संजीवराजेंना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आ. मकरंद पाटील यांना मंत्रिपदातून डावलल्याने वाई विधानसभा मतदारसंघात नाराजी व्यक्त होत होती. अनेक ठिकाणी राजीनामा नाट्य सुरू झाले होते.
त्यामुळे आ. मकरंद पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठी त्यांच्या मतदारसंघात अध्यक्षपद देतील, अशी अटकळ होती. शिरवळचे उदय कबुले आणि खंडाळ्याचे मनोज पवार यांच्या नावांची चर्चा होती. उपाध्यक्षपदासाठी कुडाळचे दीपक पवार, पाटणचे राजेश पवार यांची नावे आघाडीवर होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यात पक्षीय समतोल राखत कबुले यांना अध्यक्षपद व विधाते यांना उपाध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला.
शशिकांत शिंदे यांना कोरेगाव-खटाव मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचा मतदारसंघ मजबूत ठेवण्यासाठी खटावच्या प्रदीप विधाते यांना अध्यक्षपद देण्यात आले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यावर सदस्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर कबुले व विधाते यांची नावे जाहीर केली. सदस्यांच्या सहमतीतून नावे जाहीर झाल्याचे सांगण्यात आले तरी वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्याची चर्चा सदस्यांमध्ये आहे.
संजीवराजे, जगदाळे, पवार, गुदगे यांना डावलून ऐनवेळी अध्यक्षपदासाठी कबुले यांचे नाव पुढे आल्याने कोणी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपून राहिली नव्हती.
निवडीनंतर वसंतराव मानकुमरे, भीमराव पाटील, अर्चना देशमुख यांनी मागील अडीच वर्षांचा संदर्भ देत विद्यमान पदाधिकाऱ्यांनी त्याच पद्धतीने काम करावे, असे सुचवले. राष्ट्रवादीने समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला तरी सातारा-जावळी विधानसभा, विधानसभा, कराड उत्तर, पाटण या विधानसभा मतदारसंघांमध्ये काही अंशी नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
मानसिंगरावांची संधी दुसऱ्यांदा हुकली
मसूरचे ज्येष्ठ सदस्य मानसिंगराव जगदाळे यांना 2017 मध्ये निवडणूक झाल्यावर अध्यक्षपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ऐनवेळी संजीवराजे यांना संधी दिली गेल्याने जगदाळे यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते. अडीच वर्षानंतर अध्यक्षपद पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने जगदाळे यांचे अध्यक्षपद निश्चित मानले जात होते. मात्र, सलग दुसऱ्यांदा जगदाळे यांची संधी हुकली.