लखनौ – महिलांवर होणारे अत्यचार आणि महिलांशी निगडीत गुन्हेगारीत मोठ्या वाढ झाली आहे. त्यातही उत्तर भारतात याचं प्रमाण अधिक आहे. असच एक प्रकरण समोर आलं पोलीस मुख्यालयात तैनात असलेल्या रुची सिंह या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली होती. आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
पोलिस कॉन्स्टेबल रुची सिंह हिच्या हत्येच्या आरोपाखाली नायब तहसीलदार पद्मेश श्रीवास्तव, त्याची पत्नी आणि आणखी एका मित्राला अटक करण्यात आली आहे. कालीमाता परिसरातील एका नाल्यात रुची सिंहचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, रुची सिंह हिचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. तिचं जून २०१९ मध्ये कॉन्स्टेबल नीरजसोबत लग्न झालं होतं. मात्र त्याआधीपासूनच रुचीचे नायब तहसीलदार पद्मेश श्रीवास्तवसोबत प्रेम संबंध होते. दोघांची ओळख फेसबुकवर झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांच्या प्रेमात होते.
दरम्यान पद्मेशसोबत लग्न करण्यासाठी रुचीने आपल्या पतीवर हुड्यासाठी त्रास देत असल्याचे खोटे आरोप लावून घटस्फोट घेतला होता. त्यानतंर तिने पद्मेशवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र पद्मेश आधीच विवाहित होता. घटनेच्या काही दिवस आधी रुचीनं पद्मेशला कॉल केला होता. मात्र त्याची पत्नी प्रगतीनं उचलला. त्यावेळी फोनवरुन रुची आणि प्रगती यांच्यात वाद झाला होता. यामुळे पद्मेश त्रस्त झाला होता. त्यातूनच त्याने षडयंत्र रचून रुचीचा काटा काढला. यात त्याने मित्राची मदत घेतली होती.
पद्मेशने रुचीला फोन करुन पीजीआय हॉस्पिटलला बोलावले. तेथे मित्राच्या मदतीनं तिला नशेचं औषध देत बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह जवळील नाल्यात फेकला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.