पिंपरी – सर्वसामान्य जीवनशैली जगत असताना लोकव्यवहाराशी सांगड घालत सार्वजनिक आयुष्य सहजतेने जगता यावे यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून तृतीयपंथीय समाजाला सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत शुक्रवार (दि.22) रोजी त्यांना मेट्रो आणि पीएमपीएमएल बसची सफर घडवली.
“आजादी का अमृत महोत्सव” साजरा करत असताना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने सर्वसमावेशक योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह तृतीयपंथीय घटकांसाठी देखील योजना आणि उपक्रमांची आखणी करण्यात येत आहे.
दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा योजनांची कृतीशील अंमलबजावणी करण्यात येत असून त्या अनुषंगाने नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी पालिकेच्या वतीने तृतीयपंथीयांना निगडी ते पिंपरी अशी पीएमपीएमएल बसची सफर घडवून आणली. यानंतर तृतीयपंथीयांना पिंपरी ते फुगेवाडी आणि फुगेवाडी ते पिंपरी असा मेट्रोप्रवास घडवून आणला. पीएमपीएमएलने यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करुन दिली होती. या सफरीसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी समन्वय केला.