पिंपरी – गेल्या आठ महिन्यांपासून 107 कोटी रुपयांची थकबाकी केली असल्याने ठेकेदारी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 22) सकाळी अचानक काम बंद केले. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाची धावपळ झाली. तर पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शहरातील अनेक पीएमपीएमएल बसथांब्यांवर शेकडोच्या संख्येने प्रवाशी उन्हात उभे होते. यावर अनेक प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
पीएमपीमध्ये एकूण सात खासगी ठेकेदार आहेत. त्यांच्या 956 बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे 700 बस दररोज मार्गावर धावतात. शुक्रवारी सकाळी अचानक या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे शहरातील भोसरी, निगडी, मोशी, पिंपरी याठिकाणच्या बसथांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सकाळीच बस नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयात वेळेवर पोहचता आले नाही. तर विद्यार्थ्यांना देखील वेळेत शाळा व महाविद्यालयांमध्ये जाता आले नाही. शहरातील अनेक बसथांब्यांवर सावलीची सोय नसल्याने या प्रवाशांना उन्हात उभे राहत पीएमपीएल बसची वाट बघावी लागली.
ठेकेदारांने संप केल्याचे लक्षात येता पीएमपी प्रशासनाने अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) अंतर्गत कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरूवात केली. त्यामुळे खासगी ठेकेदारांनी संपातून अंग काढत माघार घेतली. त्यामुळे दुपारी बारा वाजल्यापासून पुन्हा कर्मचारी कामावर रुजू होण्यास सुरूवात झाली. परिणामी दुपारी एक वाजल्यापासून पीएमपीएलची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र त्यानंतर कारवाईची घोषणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दुपारी बारा वाजताच संप मागे घेतला. त्यामुळे पीएमपीएलच्या सर्व बस वेळेवर धावू लागल्या आहेत.
– राजेश रुपन्नवर, व्यवस्थापक, पीएमपीएल.
भविष्यनिर्वाह निधी न दिल्याच्या तक्रारी
खासगी ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी संप करण्यापाठीमागे वेगळे कारण असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. दोन दिवसांपूर्वीच ठेकेदारांना 54 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे थकबाकी असल्याने संप करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तर ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा केला जात नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्याचा राग मनात धरून ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असेल असा दावा पीएमपीएल प्रशासनाने केला आहे.