पुणे – शहरात मद्यपी वाहनचालकांवर नियमित कारवाई होणे जवळपास बंदच झाले आहे. तर, “ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी “टार्गेट’पुरतीच उरली आहे. त्यामुळे हे मद्यपी वाहनचालक “सुसाट’ धावत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांत पाहिले असता, केवळ टार्गेट असते म्हणून दि. ३१ डिसेंबरच्या रात्री आणि मार्च एण्डच्या तोंडावर दंड “वसुली’पुरती कारवाई केली जाते. त्याला विशेष मोहीम असेही नाव दिले जाते. त्यानंतर मात्र पोलिसांच्या डोळ्यांदेखत रात्री उशिरापर्यंत पब, बार, रेस्टाॅरंट, वाइन शाॅप्स उघडे असतात. मात्र, मोहीम संपताच “ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी गुंडाळली जाते.
शहरात कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, बाणेर, कोंढवा आणि पुणे स्टेशन परिसरात पबची संख्या मोठी आहे. तरुण मोठ्या संख्येने पबमध्ये जातात, तेथे मद्यपान करतात. हे चित्र सर्रास दिसते. मात्र, पोलिसांनी २०२२मध्ये केवळ ३७ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली असून, २०२३मध्ये ५६२ वाहनचालकांवर आणि चालू वर्षात आतापर्यंत ४७९ वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
टोइंगवर लक्ष
शहरात अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याचे दिसून येते. मात्र, नो-पार्किंगमधील वाहनांवर “टोइंग’ची कारवाई करण्यावरच वाहतूक पोलिसांचे सर्वाधिक लक्ष असते, असे पोलिसांनी केलेल्या वाहतूक नियमभंग कारवाईच्या आकडेवारीवरून समोर येते.