100 कोटींच्या ठेवी बॅंकेत ठेवण्यास मान्यता
पुणे – महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेले तब्बल 100 कोटी रुपये राष्ट्रीयकृत बॅंकेत गुंतविण्यास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 2015-16 मध्ये महापालिकेकडून तब्बल 607 कोटींचा निधी गुंतवणूक न करता एका बॅंकेत ठेवला होता. त्यामुळे प्रशासनाचे तब्बल 43 कोटी 60 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका राज्याच्या लेखा परीक्षण विभागाने ठेवला होता. त्यामुळे उशिरा का होईना पण शहानपण सूचलेल्या प्रशासनाने ही रक्कम गुंतविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवला होता. त्यास मान्यता देण्यात आल्याचे समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
मिळकतकर तसेच इतर सेवा शुल्कांचा बॅंकेत जमा झालेला निधी कोणतेही कारण नसताना बॅंकेत पडून ठेवल्याने महापालिकेस 2015-16 या आर्थिक वर्षात या रकमेवर मिळू शकणारे तब्बल 43 कोटी 60 लाख रुपयांचे व्याज बुडाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.
राज्य शासनाकडून महापालिकेच्या 2015-16 या आर्थिक वर्षात केलेल्या लेखा परीक्षणात ही बाब समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निधीचा विनियोग मनमानी पद्धतीने केला जात असल्याचे या निमित्ताने समोर आले होते. ही बाब सर्व प्रथम दैनिक “प्रभात’ने उजेडात आणल्यानंतर त्याचे पडसाद महापालिकेच्या मुख्य सभेतही उमटले होते.
तसेच, नुकसान झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर्षी जुलैमध्ये याबाबतचे पत्र पालिकेस प्राप्त झाले होते. त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने शासनाच्या कारवाईच्या भीतीने का होईना पण, अखेर तिजोरीत पडून असलेली रक्कम गुंतविण्याचा निर्णय घेतला असल्याने 70 कोटी रुपये आयुक्तांच्या अधिकारात तर, 30 स्थायी समिती अधिकारात गुंतविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेला या गुंतवणुकीमधून शहर विकासासाठी मोठी रक्कम व्याजाच्या स्वरूपात परतावा म्हणून मिळणार आहे.