आ. बाळासाहेब थोरात : शिवसेनेने मराठी बाणा दाखविला; तिन्ही पक्ष राज्यघटनेला धरुन चालणार
संगमनेर – राज्य सरकारच्या स्थापनेचा विषय सुरू असतानाच महापालिकेच्या निवडणुका देखील लवकरच जाहीर होतील. या निवडणुकीतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस महाशिवआघाडीने एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे या निवडणुका देखील महाशिवआघाडी एकत्रित लढण्याची शक्यता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या विश्रामगृहात आज आ. थोरात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, राजभवनात राज्यपालांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने एकत्रित वेळ मागितला होता. मात्र निवडणूक आयोगाला हिशेब देण्याचे शेवटचे दोन-तीन दिवस शिल्लक आहेत. यामुळे सर्व उमदेवारांना मतदारसंघात जाण्यास सांगितले. यादृष्टीने ही भेट रद्द करण्यात आली आहे.तसेच पुढील आठवड्यात राज्यपालांचा वेळ घेत महाशिवआघाडीचे नेते एकत्रित भेट घेतील. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येणार आहेत.
या पक्षांची विचारधारा वेगवेगळी असल्याने कोणतीही घाई न करता आम्ही एकत्र येणार आहोत. तसेच यासाठी वेळ आवश्यक आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष राज्यघटनेला धरुन चालत आहेत. राज्यघटनेचा मुलभूत तत्त्वांचा बळकट धागा आमच्यात आहे. त्यामुळे आम्ही सरकार यशस्वीपणे चालवू शकतो, असेही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात सरकार स्थापनेबाबत शरद पवारांबरोबर आमचीही हीच भूमिका आहे की, सरकार पाच वर्षे टिकवायचे आहे. त्यामुळे सर्वच गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे. काही शंका न ठेवता पुढे गेले पाहिजे. त्यानुसार चर्चा सुरु आहे. दिल्लीतही याबाबत चर्चा केली. कदाचित चार दिवस जास्त जातील, मात्र जे होईल ते व्यवस्थित होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
महापालिकेच्या निवडणुका होत आहेत.
आम्ही तर अजून काही तसे आदेश दिलेले नाहीत. मात्र स्थानिक पातळीवर भाजपला दूर ठेवण्यासाठी कार्यकर्ते संख्याबळासाठी तसा निर्णय घेऊ शकतात, असे ते म्हणाले. शिवसेनेला भाजपने दिलेला शब्द पाळला जात नसल्याने त्यांनी मराठी बाणा दाखवला, याच कौतुकच करायला हवे, असेही ते यावेळी म्हणाले. भाजप अजूनही सत्ता स्थापनेचा दावा करीत आहे. केलेला हा दावा म्हणजे निवडणुकीपूर्वी त्यांना 220 जागा मिळणार आहेत, असे वाटण्यासारखे आहे, अशी टीकाही थोरात यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.