येरवडा – व्हीव्हीआयपी रस्ता असलेल्या संगमवाडी रस्तावरील पथदिवे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. “जी 20′ परीषदेसाठी शहर सजलेले असताना “जी 20’चे प्रतिनिधी ज्या रस्त्यावरुन बैठकीसाठी येणार तोच रस्ता अंधारात बुडालेला, असे वृत्त “प्रभात’मध्ये प्रसिद्ध होताच पालिकेचा विद्युत विभाग कामाला लागला. “जी 20’मुळे केंद्राने पालिकेला चकाचक करण्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला असल्याने शहराचे काही दिवसासाठी का होइना रुप पालटण्याचे काम सुरू आहे.
अनेक रस्ते, चौक, पूल सजविण्यात येत होते. मात्र, ज्या रस्त्यावरुन हे प्रतिनिधी शहरात प्रवेश करणार तो रस्ताच अंधारात होता. त्यातच या ठिकाणी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचा थांबा असल्याने हजारोंच्या संख्येत प्रवासी येत जात असतात. रात्रीच्यावेळी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांची मोठी वर्दळ असल्याने प्रवाशांना अंधारातच उभे राहवे लागत असे, यातून चोरटे-भामटे प्रवाश्यांची लुटमार करीत होते, ही बाब वृत्तातून प्रसिद्ध होताच येथील पथदिवे सुरु करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
या ठिकाणी कचरा जाळल्याने केबल जळाली होती. त्यामुळे काही पथदिवे बंद होते. त्यातच हे दिवे सुरु होण्यासाठी ड्राइव्हर लागतो तो नादुरुस्त झाला होता. तो आता बदलला असल्याने येथील दिवे सुरु करण्यात आले आहे, असे विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता मंगल मारतळेकर म्हणाले.