खासदार सुळेंची हॅट्ट्रिक, की कांचन कुलांचा संसदप्रवेश?

निवडणूक निकालाकडे लक्ष ः बारामती लोकसभा मतदारसंघात पैजा
बारामती –
बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे व दौंड तालुक्‍यातील भाजपच्या नवख्या उमेदवार कांचन कुल यांच्यात चुरशीचा सामना रंगला. या सामन्यात हॅट्ट्रिक का नवख्या उमेदवार कांचन कुल यांचा संसद प्रवेश, याचे गणित मतदारसंघात मांडले जात आहे. या निकालावर सहा मतदारसंघात पैजा लावल्या जात आहेत. या आखाड्यात कोण बाजी मारणार, याबाबत गुरूवारच्या (दि. 23) निकालाकडे नजरा लागून
राहिलेल्या आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातून माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या कन्या सुळे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात दौंडचे (स्व) माजी आमदार सुभाष कुल यांच्या सून कांचन कुल या उमेदवार म्हणून पहिल्यांदाच लढत देत आहेत. राष्ट्रवादीविरुद्ध भाजप अशी जोरदार लढत लोकसभेसाठी झाली. एका बाजूला शरद पवार यांच्या नेतृत्वखाली तयार झालेल्या सुप्रिया सुळे यांचे विकासकाम पाहता त्यांनी गेल्या 10 वर्षांत शासकीय योजना तळागाळात पोहचविल्या आहेत. लोकहितासाठी कार्यरत राहिल्या आहेत.

सुळे यांनी कामाचा ठसा उमटविल्याने त्यांना संसदरत्न म्हणून गौरविण्यात आले आहे. दुसरीकडे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनाही राजकारणाचा वारसा असल्याने पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत कुल यांनी पवार कुटुंबीयांची प्रचारात चांगलीच दमछाक केली. पवार कुटुंबातील व्यक्‍तींना याच मतदारसंघात फिरायला भाग पाडले. नवख्या उमेदवार असूनही त्यांनीही भाजपच्या माध्यमातून चांगली फळी उभारत प्रचारात आघाडी घेतल्याचे दाखवून दिले. यापूर्वी लोकसभेची निवडणूक कधी व्हायची व कोण निवडून आले, याचा जनतेला विसर पडायचा.

फक्‍त आज मतदान आहे. इतकेच माहित असायचे. मात्र, या निवडणुकीत बदल झाला आहे. अगदी ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुकीप्रमाणे गल्ली, बोळात जाऊन मतदान मागावे लागले आहे. त्यामुळे लोकसभेची झलक ग्रामपंचायतीच्या शिवारापर्यंत विसावली आहे. दरम्यान, लोकसभेचा निकाल चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. जनतेचा कौल गुलदस्त्यात आहे. त्यापूर्वी मतदारसंघातील स्थानिक नेते, कार्यकर्ते निकालावर पैजा लावत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.