मुंबई – विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्यावतीने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता, पण तो फेटाळण्यात आल्याचे वृत्त आहे. हा प्रस्ताव एका अज्ञात इमेलद्वारे दाखल करण्यात आला होता. यावर 34 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे सांगण्यात आले होते.
तथापि त्यांच्यापैकी कोणीही प्रत्यक्ष उपसभापतीच्या कार्यालयात येऊन हा प्रस्ताव दाखल केलेला नाहीं असे तांत्रिक कारण नमूद करीत हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. तसेच हा प्रस्ताव शिवसेनेच्या लेटर हेडवर सादर करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेचे गट नेते राहिलेले नाहीत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळेही हा प्रस्ताव मान्य केला गेलेला नाही असे सांगितले जात आहे.
आता उपसभापतींच्यावतीनेच सोळा बंडखोर आमदारांवर अपात्रतेच्या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. उपसभापतींवर आता कोणताही अविश्वास प्रस्ताव अस्तित्वात नसल्याने उपसभापतींना या आमदारांना अपात्र ठरवण्याचा पुर्ण अधिकार आहे असा दावाही केला जात आहेत. उपसभापतींच्या या निर्णयाच्या विरोधात बंडखोर गट आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे असे समजते.