श्रीनगर – नियंत्रण रेषेवरील (एलओसी) लॉंचपॅडवर सुमारे 150 दहशतवादी उपस्थित आहेत, ते जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी तयार आहेत. तर आणखी 500 ते 700 दहशतवादी सीमेपलिकडील अकरा दहशतवादी तळांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती एका लष्करी अधिकाऱ्याने आज दिली. ते म्हणाले की सीमे पलिकडून असे प्रयत्न सुरू असले तरी सुरक्षा दलांनी खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न आत्तापर्यंत यशस्वीपणे हाणून पाडला आहे.
प्रत्यक्ष लॉचिंग पॅड खेरीज मनशेरा, कोटली आणि मुझफ्फराबाद येथील 11 प्रशिक्षण शिबिरांमध्ये सुमारे 500 ते 700 लोक प्रशिक्षण घेत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. मे अखेरपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे. अलिकडेच एक विशिष्ट गट घुसखोरीसाठी आला होता पण त्यांचा बांदीपोरा आणि सोपोर चकमकीत खात्मा करण्यात आला आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
ते म्हणाले की घुसखोरांचे लक्ष आता पीर पंजालच्या दक्षिणेकडे वळले आहे. किंबहुना, काही लोक नेपाळमार्गेही येण्याच्या प्रयत्नात असावेत, अशी माहिती त्यांनी दिली.