तलाठ्यांच्या चुका शेतकऱ्यांच्या माथी

ऑनलाइन सातबारा दुरूस्तीसाठी वर्षभर प्रतीक्षा : हवेली तहसीलमधील कारभार

– संदीप बोडके

थेऊर – हवेली तालुक्‍यात हस्तलिखित सातबारे हे ऑनलाइन करताना असंख्य चुका तलाठी भाऊसाहेबांनी केल्या आहेत. त्या दुरूस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना मात्र तलाठी व तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.

कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील गट नंबर 575/1 मधील सातबारातील नावे तत्कालीन तलाठ्याच्या चुकीने गायब झाली आहेत. हवेलीतील सातबारातील तलाठ्यांच्या चुका दुरूस्तीसाठी (155 अन्वये) एक वर्षाहून अधिक वेळ वाया जात आहे. तहसील कार्यालयातील कारभाराची चर्चा वरिष्ठ कार्यालयात होत आहे. शासनाच्या “शासन आपल्या दारी’ उपक्रमातून एकाच ठिकाणी तात्काळ कामे झाल्याने सर्वसामान्यांनी समाधान व्यक्‍त केले. मात्र, तलाठ्यांच्या ऑनलाइन चुकांमुळे “शेतकरी तहसील कार्यालयाच्या दारी’ म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ 7/12 व 8 अ उतारा मिळणेकामी संगणक प्रणालीचा वापर करून ऑनलाइन सातबारा देण्याचा यशस्वी उपक्रम राबवला आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मंडलाधिकारी व तलाठी यांना हस्तलिखित सातबारा हा ऑनलाइन करण्याचे उद्दिष्ट दिले. यासाठी ठराविक कार्यकाळ ठरवून दिला. असंख्य तलाठ्यांना संगणकावरील कामकाजाची माहिती व प्रशिक्षण नसल्याने त्यांनी खासगी उमेदवारांची मदत घेऊन शंभर टक्‍के काम पूर्ण केले. मात्र, त्यांनी केलेल्या चुकांची किंमत शेतकऱ्यांना आता मोजावी लागत आहे.

हस्तलिखित सातबारा हा ऑनलाइन करताना शेतकऱ्यांची नावे चुकीची आहेत, कित्येक शेतकऱ्यांच्या नावे कब्जेदार सदरी शेतजमीन क्षेत्र चुकीचे आहे. सातबारामधील आणेवारी ही ऑनलाइन सातबारावर हेक्‍टर व आरमध्ये घेताना चुका झाल्याने सातबाराचा मेळ बसत नाही. त्यामुळे क्षेत्र कमी- जास्त झाल्याने खातेदार शेतकऱ्यांची चिडचिड वाढली आहे. महसूलच्या चुकीच्या कारभाराचा फटका हवेलीतील शेतकऱ्यांना बसला आहे. सातबारा दुरूस्तीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. यात तहसील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी हतबल झाले आहेत.

हस्तलिखित सातबारा लिहताना व पुर्न: लिहताना हस्तदोषाने चुका झाल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966 चे कलम 155 अन्वये चूक दुरूस्ती करण्याचा आदेश तहसीलदार त्यांच्या स्तरावर काढतात. याकामी संबंधित शेतकऱ्यांनी तालुका तहसील कार्यालयात 155 अन्वये अर्ज दाखल करावयाचा असतो. त्यासोबत तलाठ्यांनी केलेली चूक ही ज्यावर्षी केली आहे. त्याअगोदरील वर्षातील व चुकीच्या नंतर सर्व 7/12 व सर्व फेरफार सादर करावयाचे असतात.

याकामी तहसील कार्यालय संबधित तलाठ्यांकडून स्वंयस्पष्ठ अहवाल मागवतात. त्यानंतर प्रस्तुतप्रकरणी टिपणी मंजूर केली जाते. त्यानंतर चूक दुरूस्तीचा आदेश पारित केला जातो. प्रस्तुतच्या आदेशाची तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाते. मात्र, याला हवेलीमध्ये एक वर्षाचा कार्यविवरणासाठी वेळ जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. थेऊर, सोरतापवाडी, कदमवाकवस्तीमध्ये गोंधळाचा सातबारा चव्हाट्यावर आला आहे.

चूक दुरूस्तीसाठी म्हणजेच 155 अन्वये दाखल होणाऱ्या प्रकरणांची आकडेवारी उपलब्ध नसून संबंधित कारकून यांच्याकडून आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर याविषयी माहिती देण्यात येईल.
-राजकुमार लांडगे, अव्वल कारकून, हवेली तहसील कार्यालय.


परिशिष्ट “क’मधून 155 अन्वये चूक दुरूस्ती होण्याकामी फक्‍त सात दिवसांचा कालावधी पुरेसा आहे. संबंधित तलाठ्याने चुक दुरूस्तीकामी प्रस्तुतचा अहवाल ऑनलाइनद्वारेच तहसीलदार यांच्याकडे पाठवायचा आहे. तहसीलदारांनी त्यासंबंधित पर्व्हुल तलाठ्यास ऑनलाइन द्यावयाचे आहे. त्या प्रिंटवर तलाठ्याने तालुका तहसीलदार यांचा सही शिक्‍का घ्यावयाचा आहे. प्रस्तुतच्या 155 चे आदेशाची अंमलबजावणी फक्‍त एकाच दिवसात करण्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. ही प्रक्रिया जास्तीत जास्त सात दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
-रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक, ई- फेरफार आज्ञावली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here