संगमनेर – मागील सरकारने गाईच्या दूध व दूध भुकटीसाठी अनुदान देण्याची केवळ घोषणा केली.त्या योजनेतील सुमारे 128 कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडे अजूनही रखडलेले असून ते अनुदानाची रक्कम लवकरच दूध संघांना देण्याच्या सूचना दुग्ध विकासमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.
याबाबत दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे ना. थोरात यांची भेट घेतली. शासनाकडे थकीत अनुदान मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावेळी थकीत अनुदान व दुग्ध व्यवसायातील अडचणीवर चर्चा झाली. रखडलेले दुधाचे अनुदान त्वरित देण्याच्या सूचना संबंधित विभागाला ना. थोरात यांनी दिल्यामुळे रखडलेले अनुदान लवकरच मिळणार आहे.
यावेळी कल्याणकारी संघाचे अध्यक्ष म्हस्के, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, राजाराम बापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, सोनई दूध संघाचे अध्यक्ष दरशर माने, पराग दूध संघाचे अध्यक्ष प्रितम शहा, चितळे दूध संघाचे अध्यक्ष श्रीपाद चितळे, एसआर थोरात दूध संघाचे अध्यक्ष आबासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी दुग्ध विभागाचे सचिव अनुप कुमार, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त नरेंद्र पोयम, प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्याबरोबर चर्चा झाली.
मागील सरकारच्या काळात दुग्ध व्यवसायात अनेक चढउतार व नवनवीन नियमावलीमुळे दूध संघांना तोटे सहन करावे लागले होते.शासनाचे अनुदान वेळेवर येत नसल्याने दूध संघांनी उत्पादकांना शासनाच्या अनुदान येण्याच्या अगोदर रक्कम दिल्यामुळे काही संघ अडचणीत आले होते.परंतु ना. थोरात यांनी रखडलेले अनुदान त्वरीत देण्याच्या सुचना संबंधित विभागाला केल्यामुळे दूध संघ व उत्पादक शेतकरी यांना दिलासा मिळणार आहे.