करोना उपाययोजना खर्चाचा तपशील देण्याचे आदेश
पुणे – ‘राज्य सरकारचा आदेश येईपर्यंत मुख्यसभा चालवणार नाही,’ असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महापालिका मुख्यसभेत स्पष्ट केले. “खर्चाचा हिशेब द्या’ आणि “आम्हांला बोलू द्या’ असा आग्रह विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशीही धरल्याने महापौरांनी “सभा होणार नाही’ हे ठणकावून सांगितले. याशिवाय “करोना उपाययोजना आणि त्यासाठी झालेला खर्च यांचा अहवाल सदस्यांना तीन दिवसांत लेखी द्या,’ असे आदेश प्रशासनाला दिले.
“आम्हांला बोलू द्या,’ असे सांगत विरोधकांनी मुख्य सभेच्या दुसऱ्या दिवशीही गदारोळ केला. बुधवारपेक्षा गुरुवारी सदस्यांची संख्या सभागृहात जास्त होती. ऑनलाइनही काही सदस्य उपस्थित होते.
“आम्हांला माहिती द्या, मुख्य सभा चालवा, पाच महिने झाले तरी आमच्या प्रश्नांना उत्तर नाही, प्रशासनाची बाजू घेऊ नका, प्रशासन नक्की काय काम करत आहे हे आम्हांला सांगा,’ अशी मागणी करत वसंत मोरे, दिलीप बराटे, विशाल तांबे, दीपक मानकर, दत्तात्रय धनकवडे, दीपाळी धुमाळ, सुभाष जगताप, महेंद्र पठारे, योगेश ससाणे, प्रकाश कदम, प्रशांत जगताप हे महापौरांसमोरील मोकळ्या जागेत आले.
“माहिती दिली जात नाही, तुम्ही कोणाला घाबरत आहात का,’ असा सवालही विरोधकांनी महापौरांना विचारला. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सदस्यांनी एकमेकांवर आरोप करण्याला सुरुवात केली. “तुमचे राज्यात सरकार आहे. तर तुम्ही मुख्य सभा चालवण्याचे आदेश आणा. सरकारकडून पैसे आणण्यासाठी तुम्ही काय केले,’ असे भाजप सदस्यांनी विरोधकांना विचारले. त्यावरून वादावादीला सुरू झाली. यातच मुख्यसभेची तहकुबी मांडण्यात आली. “आम्ही जेव्हा तहकुबी मान्य करतो, तेव्हा आमचीही खर्चाचा तपशील आणि उपाययोजनांची माहिती हवी असल्याची मागणी पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला द्या,’ अशी मागणी तांबे यांनी केली. त्यावर तीन दिवसांत ही माहिती देण्याचे आदेश महापौरांनी दिले.
हवा-पाण्याच्या “ऑनलाइन’ गप्पा
सभागृहात गोंधळ सुरू असताना “ऑनलाइन’ असलेल्या सदस्यांचा मात्र हवा-पाण्याच्या गप्पा सुरू होत्या. “जेवण झाले का’, “प्रकृती कशी आहे’ वगैरे गप्पा सुरू होत्या. त्यामुळे मुख्यसभेकडे किती गांभीर्याने पाहिले गेले, याचा प्रत्यय या निमित्ताने आला.