महापौरांकडून पोलिसांचे आभार : आयुक्तांकडून मात्र नकार
पिंपरी – रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत महापौर उषा माई ढोरे यांनी 11 डिसेंबर रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली. मात्र अशी कोणतेही योजना पोलीस राबवित नसल्याचे सांगत पोलीस आयुक्तांनी खंडन केले आहे. यामुळे महिला सुरक्षेबाबत महापौरांची ती पोस्ट “फुसका बार’ ठरल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
हैद्राबाद येथे झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणानंतर देशभरात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील महिलांनाही रात्री-अपरात्री घरी परतत असताना सुरक्षा मिळावी, यासाठी शहराच्या प्रथम नागरिक महापौर माई ढोरे यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेतली. यावेळी महापौरांनी त्यांना एक निवेदनही दिले. निवेदन देतानाचा फोटो त्यांनी फेसबुकवर 11 डिसेंबर रोजी पोस्ट केला. या पोस्टमध्ये “पिंपरी चिंचवडमधील महिला सुरक्षिेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज’ या शीर्षकाखाली महापौर माई ढोर यांनी पोलिसांच्या योजनेची माहिती दिली. रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत घरी सोडण्यास महिलांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधवा.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या या सुविधेसाठी महापौर माई ढोरे यांनी पोलीस प्रशासनाचे मनापासून आभारही मानले. त्यांनी फेसबुकवरील ही पोस्ट काही जणांना टॅगही केली आहे. आयुक्तांना निवेदन देतानाचा फोटो आणि सोबत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे फोन नंबरही महापौर देण्यास विसरल्या नाही. त्यांच्या या पोस्टचे महिलांनी जोरदार स्वागत केले आहे. तसेच महापौरांनी महिला सुरक्षेबाबत केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. परंतु पोलिसांनी अशा प्रकारे सुरक्षा देण्याचे आश्वासन आपण दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मदत करु पण वाहन उपलब्ध करुन देणे शक्य नाही
पोलिसांच्या या सुविधेबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना विचारले असता अशी कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्तालयात सुमारे 25 लाख नागरिक राहतात. त्यापैकी 50 टक्के महिला आहेत. यामुळे अशी सुविधा पोलीस देऊच शकत नाहीत. सध्या पोलिसांकडे वाहनांची कमतरता आहे. यामुळे ही योजना राबविणे शक्य नाही. महापौरांचा गैरसमज झाला असावा, असेही पोलीस आयुक्त बिष्णोई म्हणाले. एखाद्या महिलेस जर रात्रीच्यावेळी काही अडचण आल्यास पोलीस तिच्या मदतीला जातील. मात्र पोलिसांचे वाहन उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.
पोस्ट होत आहे व्हायरल
महापौरांची फेसबुकवरील पोस्ट पाहून अनेक नगरसेवकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या फोन नंबरसह ही पोस्ट शहरभर व्हायरल केली. महापौरांच्या पुढाकाराने पोलिसांनी केलेल्या उपाययोजनेचे सर्वत्र कौतुकही होत आहे. बहुतांश सर्वचजण या पोस्टची खातरजमा न करता आजही ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.