विक्रीदरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ
पुणे – राज्यात पॅकिंग दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रति लिटरमागे दोन रुपयांची वाढ लागू केली जाणार आहे. सोमवारपासून (दि.16) ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
दूध खरेदी-विक्रीच्या दराचा आढावा घेण्यासाठी सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज डेअरी येथे पार पडली. या सभेला राज्यभरातील साठ सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत दूध दरवाढीच्या निर्णयावार शिक्कामोर्तब करण्यात आले. दूध उत्पादक शेतकरी व ग्राहक यांच्या हिताचा विचार करून, एकच दूध दर ठेवण्याचा निर्णय गेल्या सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार दूध खरेदी दरात वाढ झाल्याने विक्री दरातही वाढ करणे क्रमप्राप्त होते.