अहमदाबाद – गुजरात विधानसभेत मॉब लिंचिंगवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान गुजरातमधील काँग्रेस आमदाराने धर्म परिवर्तनाबाबत मोठे विधान केले आहे. काँग्रेसचे आमदार घियासुद्दीन शेख यांनी गुजरात विधानसभेत सांगितले की, गेल्या 2 वर्षांत अधिक मुस्लिम मुलींनी हिंदू धर्म स्वीकारला आणि हिंदू मुलांशी लग्न केले.
काँग्रेसचे आमदार घियासुद्दीन शेख मॉब लिंचिंगवर बोलताना म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी मणिनगरमध्ये एक मुस्लिम तरुण एका हिंदू महिला मैत्रिणीसोबत होता. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. दोन्ही कुटुंबे जवळची असून ही घटना दुर्दैवी असल्याचे मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. वडिलांच्या या वक्तव्यानंतरही अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे आमदार घियासुद्दीने यांनी सांगितलं.
काँग्रेस आमदार घियासुद्दीन पुढं म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आहोत की एका समुदायाला लक्ष्य केले जात आहे. वृत्तवाहिन्याही हिंदू-मुस्लिम चर्चांनी भरलेल्या असतात. लग्नासाठी धर्मांतर केलेल्या हिंदू बहिणींपेक्षा गेल्या दोन वर्षांत जास्त मुस्लिम मुलींनी हिंदू धर्म स्वीकारला आणि लग्न केले. गेल्या वेळी मी मंत्र्यांना अशी 100 उदाहरणे दिली होती. मात्र अशा गोष्टींना चुकीच्या पद्धतीने मांडलं जातं, असंही त्यांनी म्हटलं.