गोळीबार प्रकरणातील व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जेरबंद

पिस्तुलसह साथीदारालाही घेतलं ताब्यात; दत्तवाडी पोलीसांची कारवाई

पुणे(प्रतिनिधी) – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेले गोळीबाराचे प्रकरण तसेच हडपसर येथील जबरी चोरीतील मुख्य गुन्हेगारास दत्तवाडी पोलिसांनी साथीदारासह जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूलही हस्तगत करण्यात आले आहे. दत्तवाडी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी दोन किलोमीटर पळत पाठलाग करुन अत्यंत धाडसाने आरोपींना पकडले आहे. अजय भागवत घाडगे (21, रा. शनिनगर, जांभुळवाडी रोड, कचरावत चाळ, कात्रज, ) आणि गणेश कविश पवार ( 21, रा. दत्तनगर चौक, जांभुळवाडी रोड, हनुमाननगर, कात्रज ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार व त्यांचा स्टाफ प्रजासत्ताक दिनाचे अनुषांगाने पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा पोलीस अंमलदार कुंदन शिंदे व अमित सुर्वे यांना खबर मिळाली की, “एक इसम पिस्टल सोबत घेवुन दांडेकर पुल पेट्रोल पंपासमोरील ट्रॅव्हल्सचे थांब्याजवळ कोणाची तरी वाट बघत थांबला आहे. त्यानूसार वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार यांनी स्टाफसह सापळा रचुन सदरचे त्याला एका साथीदारासह ताब्यात घेतले अजय भागवत घाडगे व गणेश कविश पवार अशी त्यांनी नावे सांगितली.

त्याची अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकुण-30,400, रुपयेचा शस्त्रसाठा सापडला. त्यांच्याविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्‍ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत अजय घाडगे हा भारती विद्यापीठ पोलीस ठाणेच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी जाळपोळ, मारामाऱ्या, तोडफोड, खुनाचा प्रयत्न अशाप्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

मागीलवर्षी ( 10 डिसेंबर) कुख्यात आरोपी गणेश पवार याचे टोळीने मागील भांडणाचा राग मनात धरुन शानिनगर भागातील सिद्दीक शेख यांना जिवंत मारण्याचे हेतुने फायरींग केली होते. तसेच कोयत्याने व हाताने मारुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याविषयी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच वरील आरोपींनी लुटमार करण्याचे उद्देशाने दि. 23 जानेवारी रोजी हडपसर भागात एका इसमास वेगो गाडीवरुन जात असताना आडवुन कोयत्याचा धाक दाखवुन त्यांचेकडील सुमारे 3.90 लाख रुपयेंचे सोन्याचे ब्रेसलेट व चैन लुटून नेली होती. याबाबत हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.

भागवत दोन वर्षे तडीपार….

अजय भागवत घाडगे हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र व पुणे जिल्हयाचे हद्दीबाहेर दोन वर्षे कालावधीकरिता तडीपार करण्यात आलेले ही कारवाई पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त पोमाजी राठोड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार , पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, राजु जाधव, पोलीस अंमलदार अमित सुर्वे, शिवाजी क्षीरसागर, महेश गाढवे, नवनाथ भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर सुतकर, शरद राऊत, राहुल ओलेकर, प्रमोद भोसले व विष्णु सुतार यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.