मुंबई – मुंबईतील एकूण 281 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात 281 पैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून या चारही जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता. तसेच त्यांचे वयदेखील 60 वर्षांपेक्षा अधिक होते. तर लस घेतलेल्यांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे मुंबईत करोनाविषयक करण्यात आलेल्या पाहणीनंतर स्पष्ट झाले आहे.
मुंबई महापालिकेने याबाबतची माहिती दिली आहे. या चाचणीचे सर्वंकष निष्कर्ष पाहता, कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणे देखील आवश्यक आहे, हे वारंवार अधोरेखित होत आहे. महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कोविड बाधा झालेल्या एकूण 345 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील 281 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या 281 नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात आले.
चाचणीतील निष्कर्षानुसार, 281 पैकी 210 रुग्ण हे डेल्टा व्हेरिअंट तर 71 रुग्ण हे डेल्टा डेरिव्हेटीव्ह प्रकारातील रुग्ण आहेत. या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक आहे. त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह विषाणू संक्रमण / प्रसार वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे.
असे असले तरी, कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, या 281 पैकी दोन डोस घेतलेल्या फक्त 8 जणांना तर पहिला डोस घेतलेल्या फक्त 21 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही. तसेच कोणाचाही मृत्यू ओढवला नाही.