कोल्हापूर – कागल-मुरगुड रस्त्यावर व्हनाळी जवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा अचानाक स्फोट झाला. यानंतर कार सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन कोसळली. या दुर्घटनेत कारचालकाचा होरपळून मृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त समजताच कागल पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. पेटत गेलेली गाडी दरीत पडल्यानंतर परिसरातील गवतालाही आग लागली. कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली. पोलिसांनी जळालेल्या कारचा शोध घेतला असता ही कार अभिजित धनवडे (रा. कणेरी) यांच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस कारमालकाचा शोध घेत आहेत. दरम्यान कार घाटात गेल्यानंतर दोन स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. घटनेची माहिती पत्रकार शिवाजी पाटील-गोरंबे यांनी कागल पोलिसांना दिली. यानंतर तत्काळ पोलीस आणि अग्निशमन घटनास्थळी पोहचले. तब्बल दोन ते अडीच तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाने परिसरात लागलेली आग आटोक्यात आणली.