दिवसभर एकाच पीपीई किटवर कोविड मृतांना द्यावा लागत आहे मुखाग्नी
शासनाने लक्ष द्यावे, अशी व्यक्त केली अपेक्षा
पुणे – करोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जेथे कुटुंबीयही थांबत नाहीत अथवा जवळही येत नाहीत, अशा रुग्णांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम ठेकेदारांमार्फत काही तरुण न घाबरता करतात; परंतु कर्मचाऱ्यांच्या जीवाची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे; परंतु दिवसभर एकच पीपीई किट घालून स्मशानभूमीतील तरुण अंत्यसंस्काराला सज्ज होत आहेत.
करोना झाल्यावर रुग्णाला ऍडमिट करून घेणे ते त्याच्या उपचारापर्यंतची जबाबदारी रुग्णालयांची असते; परंतु एखादा गंभीर रुग्ण दगावल्यास त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह न देता, नियमानुसार प्रक्रिया करून तो स्मशानभूमीत पाठवला जातो. त्यावेळी नातेवाईक सोबत असतात; परंतु, त्याची पुढची अंत्यसंस्काराची सगळी प्रक्रिया स्मशानभूमीतील कर्मचारी पार पाडतात.
एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी एक पीपीई किट देणे आवश्यक असताना येथे दिवसाला एक पीपीई किट कर्मचाऱ्यांना दिले जाते. तेच किट घालून हे कर्मचारी दिवसभरात आलेल्या करोना बाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत असतात.
हे पीपीई किट दिवसभर अंगावर घालून बसणे शक्य नसते, त्यात खूप उकडते आणि घामही येतो; परंतु केवळ मास्कच्या सहाय्याने अंत्यसंस्कार करणेही शक्य नाही. अशावेळी एक, दोन अंत्यसंस्कार झाले की, पीपीई किट बदलणे आवश्यक आहे.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी ठेकेदार जरी नेमला असला तरी त्यांना पीपीई किट पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यांनी किमान तीन ते चार तासांनी पीपीई किट बदलणे अपेक्षत आहे. आपण, त्यांना हवे तेवढे पीपीई किट उपलब्ध करून देतो.
– श्रीनिवास कंदूल, विद्युत विभागप्रमुख, महापालिका
महापालिकेकडून पुरेसे पीपीई किट मिळतात. सध्या, दिले जाणारे पीपीई किट हे “वॉशेबल’ असल्याने त्याचा पुनर्वापर करू शकतो. याशिवाय स्मशानभूमींची संख्या वाढविण्यात आल्यापासून एकाच ठिकाणी येणाऱ्या मृतदेहांची संख्याही बऱ्यापैकी कमी झाली आहे.
– अभिषेक जंगम, ठेकेदार