नवी दिल्ली – चीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया हे विशेष चिंता वाटावी असे देश असल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. धार्मिक हक्कांच्या गंभीर पायमल्लीबाबत अमेरिकेने ही चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांनी सोमवारी ही घोषणा केली.
अमेरिकेच्या संसदेने १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा मंजूर केला आहे. तेंव्हापासून धार्मिक स्वातंत्र्य हा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा मध्यवर्ती उद्देश आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणाची कटिबद्धता जपत म्यानमार, चीन, क्युबा, उत्तर कोरिया, एरिट्रीया, इराण, निकारागुआ, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकीस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांना धार्मिक स्वातंत्र्याची गंभीर पायमल्ली होत असलेले देश म्हणून घोषित करण्यात येत आहे, असे ब्लिंकेन म्हणाले.
याव्यतिरिक्त, त्यांनी अल्जेरिया, अझरबैजान, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, कोमोरोस आणि व्हिएतनाम या देशांना धार्मिक स्वातंत्र्याच्या गंभीर उल्लंघनांमध्ये गुंतलेल्या किंवा सहन करावे लागण्यासाठी विशेष देखरेख ठेवाव्या लागणार्या देशांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे.
अल-शबाब, बोको हराम, हयात तहरीर अल-शाम, हौथी, इसिस-साहेल, इसिस-पश्चिम आफ्रिका, अल-कायदा संलग्न जमात नसर अल-इस्लाम वाल-मुस्लिमिन आणि तालिबान या संघटनांना विशेष चिंता वाटावी अशा संघटना म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. ज्या देशांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, अशा काही देशांमध्येही धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन होत असते, असेही ब्लिंकेन म्हणाले.