पणजी – एका स्टार्ट-अप कंपनीच्या ३९ वर्षीय महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने गोव्यात आपल्या चार वर्षांच्या मुलाची कथितपणे हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह कपड्यात गुंडाळून ही महिला कर्नाटकात गेल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
सूचना सेठ असे या महिला सीईओचे नाव आहे. तिला गोवा पोलिसांनी रविवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे अटक केली. ते म्हणाले, हत्येमागील हेतू अद्याप कळू शकलेला नाही. सेठच्या लिंक्डइन पेजनुसार, ती स्टार्ट-अप माइंडफुल एआय लॅबची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहे आणि २०२१ साठी आर्टिफिशीयल इंटेलिजन्स नीतिशास्त्रातील १०० ब्रिलियंट वूमनमध्ये तिचा समावेश करण्यात आला होता.
कळंगुट पोलिस ठाण्याचे निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले की, तिने ६ जानेवारी रोजी तिच्या मुलासह उत्तर गोव्यातील कँडोलीम येथे भाड्याने एक अर्पाटमेंट घेतले होते. दोन दिवस तिथे राहिल्यानंतर तिने अपार्टमेंट कर्मचार्यांना सांगितले की तिला काही कामासाठी बंगळुरूला जायचे आहे. तिने त्यांना टॅक्सीची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यावेळी संबंधीत कर्मचार्यांनी तिला सुचवले की ती बेंगळुरूला फ्लाइट घेऊ शकते जी टॅक्सी भाड्याने घेण्याऐवजी स्वस्त पर्याय असेल.
पण तिने फक्त टॅक्सीनेच प्रवास करायचा असा हट्ट धरला आणि त्यानुसार तिच्यासाठी ८ जानेवारीला एका वाहनाची व्यवस्था करण्यात आली आणि ती पहाटे निघाली. नंतर, अपार्टमेंटचे कर्मचारी ती ज्या खोलीत राहिली त्या खोलीची साफसफाई करण्यासाठी गेले असता त्यांना टॉवेलवर रक्ताचे डाग आढळले.
अपार्टमेंटच्या व्यवस्थापनाने कळंगुट पोलिसांना ताबडतोब ते कळवले. कर्मचार्यांनी असेही सांगितले की महिलेचा चार वर्षांचा मुलगा अपार्टमेंटमधून बाहेर पडला तेव्हा तिच्यासोबत दिसला नाही आणि ती एक विलक्षण जड बॅग देखील घेऊन गेली होती, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बोलावून तिच्याकडे रक्ताचे डाग आणि तिच्या “बेपत्ता” मुलाबद्दल चौकशी केली. त्यावेळी संबंधीत महिलेने पोलिसांना सांगितले की रक्ताचे डाग तिच्या मासिक पाळीमुळे होते. तिने पोलिसांना सांगितले की तिचा मुलगा मडगाव शहरात (दक्षिण गोव्यात) तिच्या मैत्रिणीकडे ठेवण्यात आला आहे.
तिच्या मैत्रिणीचा जो पत्ता तिने दिला होता तिकडेही पोलिसांनी तातडीने चौकशी केली त्यावेळी हा पत्ता खोटा निघाला. या महिलेशी पोलिसांनी फोनवर हे बोलणे केले. तो पर्यंत ती चित्रदुर्ग कर्नाटक येथे पोहचली होती. चित्रदुर्गातील पोलिसांनी महिलेची बॅग तपासली ज्यामध्ये त्यांना मुलाचा मृतदेह आढळला. त्यानंतर कळंगुट पोलिसांचे पथक चित्रदुर्ग येथे रवाना झाले आणि तिला ताब्यात घेतले. पोलिसांनी या घटनेची माहिती आरोपीचा पती व्यंकट रमण याला दिली आहे, जो सध्या जकार्ता येथे आहे.