सोलापूर – एकदिवसीय विश्वकरंडकाचे (worldcup 2023) सामने सध्या सुरू असून, क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या संघाचा सामना पाहण्यासाठी वेळ राखून ठेवतात. अशात, सामना सुरू होण्याच्याआधीच वीज गेल्यावर एखाद्या क्रिकेटप्रेमीला राग येणे साहजिक आहे.याच रागाच्या भरात एकाने चक्क महावितरणच्या (Mahavitran employee) कर्मचाऱ्यालाच बेदम मारहाण केली आहे. सोलापूर जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली आहे.
विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे क्रिकेटची मॅच (Cricket match) पाहता येणार नाही, म्हणून संतापलेल्या एका व्यक्तीने महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी पाइप मारला. ही घटना औद्योगिक वसाहत वीज वितरण कार्यालयात बुधवारी घडली आहे. तर, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महावितरण कर्मचारी संघटनेने सोलापूर पोलिसांकडे निवेदनद्वारे केली.(Solapur News)
नेमकं काय घडलं ?
सोलापुरातील कुमठा नाका परिसरात महाराणा प्रताप झोपडपट्टी येथील विद्युत लाइनवरील झाडाच्या फांद्या तोडण्याकरिता वायरमन ट्रान्सफॉर्मर बंद करून काम करित होते. त्या भागातील संजय कोल्हापूरे या वीज ग्राहकाने औदयोगिक वसाहत उपकेंद्र येथे फोन करून प्रधान यंत्रचालक झुल्फीकार शेख यांना जाब विचारला. त्यांनी काम चालू असल्याचे सांगितले. दीड तासांत वीजपुरवठा पूर्ववत होईल सांगताच कोल्हापुरे याने फोनवरुन अरेरावी सुरू केली.
त्यानंतर तो दुपारी 4 वाजेच्या दरम्यान वीज ग्राहक उपकेंद्राच्या आवारात पोहचला. तसेच महावितरण कर्मचारी शेख यांना धमकावीत ‘मॅच चालु झाली आहे, तुम्ही मुद्दामहुन लाइन बंद केली’ म्हणत स्ट्रीट लाइटचा लोखंडी पाइप त्याने त्यांच्या डोक्यावर घातला. मात्र, यावेळी शेख यांनी स्वतःचा बचाव केल्याने तो डोक्यात न लागता मानेवर लागला. या हल्ल्यात शेख हे बेशुद्ध पडले. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.