माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंचत्वात विलीन

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज नवी दिल्लीतील  लोधी रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी मुखाग्नी दिला.

तत्पूर्वी प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव देह सकाळी 9.30 दरम्यान राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.आज दुपारी 2 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. यावेळी त्यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली.

प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान कोरोना प्रोटोकाॅलचे पालन केले गेले. यावेळी त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांच्यासह कुटुंबियांनी पीपीई किट परिधान केले होते.

माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जीं यांच्या निधनानंतर राष्ट्रपती भवन आणि संसदेतला झेंडा अर्ध्यावर आणला गेला आहे. केंद्र सरकारने देशात सात दिवसांचा(31 ऑगस्ट 2020 ते 6 सप्टेंबर 2020 ) राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतलं आणि मुखर्जी कुटुंबियांचं सांत्वन केलं. तसेच सीडीएस बिपिन रावत तसेच तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदींनी त्यांना पुष्पचक्र अर्पण केलं.

10 ऑगस्ट रोजी मेंदूतील रक्‍ताच्या गुठळ्या हटवण्यासाठीच्या शस्त्रक्रियेसाठी मुखर्जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर केलेल्या कोविडसाठीच्या चाचणी दरम्यान मुखर्जी यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने त्याच्याशी संबंधित उपचारही सुरू होते. रविवारी रक्‍तदाब घटल्याने आलेल्या “सेप्टिक शॉक’मुळे सोमवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचे निधन झाले.
प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी सर्वप्रथम मुखर्जी यांच्या निधनाची बातमी ट्‌विटरवर दिली. “डॉक्‍टरांचे प्रयत्न, देशभरातील नागरिकांच्या प्रार्थनांनंतरही प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले.’ असे अभिजीत मुखर्जी यांनी ट्‌विटर संदेशामध्ये म्हटले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.