नगर, (प्रतिनिधी) – मार्च महिना सुरू झाला की नगर शहरात हमखास आंबा दाखल होतो. त्याप्रमाणे नगरच्या बाजारपेठेत आठ दिवसांपासून आंबे दाखल झाले आहेत. मात्र, त्याचे दर पाहता सर्वसामान्यांना सध्या तरी परवडणारे नाहीत. नगर शहरात रत्नागिरी, देवगड हापूस आंबे दाखल झाले आहेत. एक डझन आंबे ७००ते १०००रुपयांत बाजारात मिळत आहेत.
दरम्यान, फळांच्या राजाचे नगरच्या बाजारपेठेत शाहीथाटात आगमन झाले असले तरी किंमती वाढल्याने गोडवा असलेला आंबा महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहकांना कडू लागला आहे. आंबे खाण्याचा खरा मुहूर्त ग्रामीण भागात अक्षय तृतीय नंतरच लागतो. सध्या नव्यानेच दाखल आंबा बाजारपेठेत भाव खात असल्याने स्वस्त झाल्यावर आंबा खाण्याची मानसिकता ग्राहकांनी केली आहे.
कोकणातून आलेल्या आंब्यात रत्नागिरी हापूस, देवगड हापूस भाव खात आहेत. आकारमानानुसार ७०० ते १००० रुपये पेटी (एक डझन) असे सध्या आंब्याचे दर आहेत. सध्या असलेली आंब्याची आवक अत्यंत कमी असून, एप्रिल-मेमध्ये त्याचे प्रमाण वाढत जाते. त्यासोबत इतर राज्यातून नगरमध्ये आंबे येतात.
२५०० रु. डझन
सध्या किमान २५००ते ३५००कमाल रुपये प्रतिपेटी (चार डझन) असा आंब्याचा दर आहे. रत्नागिरी, देवगड हापूस आंबे बाजारात दाखल झाले आहेत. नगर शहरातील नवीपेठेत आंब्याची दुकानांमध्ये पिवळे धमक आंबे दाखल झाले आहेत.
आंबा आला कोकणातून
फळांचा राजा असलेल्या आंब्याचे चार दिवसांपूर्वी कोकणातून शहरात आगमन झाले आहे. पिवळ्या धमक आंब्याची विक्रीसाठी मांडणी सजावट करणारे स्टॉल शहरात ठिकठिकाणी दिसू लागले आहेत.
सिझनमधील आंबा सर्वप्रथम खाण्याची इच्छा असणारी मंडळी शहरात मोठ्या प्रमाणात असून, त्यांची आगाऊ मागणी आहे. सुरुवातीला महाग वाटत असले तरी आवक प्रमाण वाढल्यानंतर मात्र ते कमी होत जातील.
नगरमध्ये कोकणातून रत्नागिरी हापूस आंबे दाखल झाले आहेत. सध्या दर जास्त असले तरी येणार्या काळात आवक वाढल्यानंतर ते कमी होतील. उपलब्ध आंब्यांना चांगली मागणी आहें. कोकण, केरळमध्ये गारपीट, अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे माल कमी आल्याने दरही वाढले आहेत. लालबाग आंबे लवकरच दाखल होतील. जगदीश आहुजा, व्यापारी