शिक्रापूर -येथील एका बेपत्ता व्यक्तीचे अपहरण होऊन पंधरा दिवस उलटूनही अद्याप शोध लागलेला नाही. या प्रकरणातील आरोपी असलेल्या भोंदू महाराज व त्याच्या साथीदारांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. मात्र त्या व्यक्तीचा शोध लावण्याचे आव्हान शिक्रापूर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
वढू बुद्रुक येथून 29 मे रोजी गजानन ज्ञानोबा घारे हा बेपत्ता झाला होता. त्यानंतर दि. 2 जूनला गजानन घारे याचे अपहरण केल्याप्रकरणी त्याची बहीण छाया बाळासाहेब लोले यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भोंदू अजित पांडुरंग शितोळे (महाराज), ईश्वर शिवाजी ढगे, रोहिदास गायकवाड यांच्याविरुद्ध अपहरण आणि इतर गुन्हे दाखल करीत तिघांना अटक केली होती.
यावेळी त्यांना पोलीस कोठडी मिळाली. पोलीस चौकशीत स्वयंघोषित अजित शितोळे महाराज याने बेपत्ता झालेल्या गजानन घारे याच्याकडून माझ्या अंगामध्ये दैवीशक्ती असल्याचे सांगत घारेकडे अंधश्रद्धा पसरवित तुझे अडकलेले लाखो रुपये काढून देतो, असे सांगत पूजाअर्चासाठी तब्बल पंचवीस लाखांहून अधिक पैसे उकळल्याचे समोर आले.
अपहरणासाठी वापरलेली चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. भोंदू महाराजाच्या गुन्ह्यामध्ये वाढ करीत फसवणूक, अंधश्रद्धाबाबतचे गुन्हे दाखल केले आहेत. महाराज व त्याच्या साथीदारांना न्यायालयाने तीनवेळा पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. मात्र, आता पंधरा दिवस उलटून गेले तरी घारेचा शोध लागलेला नाही.
तिघांची रवानगी येरवडा कारागृहात
अपहरण प्रकरणातील भोंदू अजित पांडुरंग शितोळे (महाराज), ईश्वर ढगे, रोहिदास गायकवाड (दोघे रा. आपटी) यांना शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे; परंतु घारे याचा शोध लागलेला नाही. घारे यांचे अपहरण भोंदू शितोळे महाराज आणि त्यांच्या साथीदारांनीच केल्याचा आरोप गजाननची बहीण छाया लोले व आई पार्वती घारे यांनी करीत अनेकदा पोलिसांची भेट घेतली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपी अटक झाले, गजाननला ज्या वाहनातून नेले ते वाहन जप्त झाले. मात्र, गजाननचा शोध का लागत नाही, असा प्रश्न बहीण छाया लोले व आई पार्वती घारे यांनी केला आहे.
कसून तपास सुरू आहे – मयूर वैरागकर
शिक्रापूर येथील अपहरण प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर वेगाने तपास करण्यात आला आहे. गजानन घारे याचा शोध घेण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो आहे. आरोपी येरवडा कारागृहात असून सर्व बाजूने तपास सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक मयूर वैरागकर यांनी सांगितले.