कराड – कराड शहरात करोनाचा कहर वाढतच चालला आहे. बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तींची संख्या खूपच अल्प आहे. जुलै महिन्यापासून शहरात बाधितांची संख्या वाढत आहे. करोना पॉझिटीव्ह संख्येची वाटचाल दीडशेकडे असून पालिका प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे. पालिकेच्या निरंतर सर्व्हेक्षणाला तातडीने सुरूवात होणे गरजेचे आहे.
गत पाच महिन्यांपासून करोनाचा कहर सुरू आहे. मात्र, कराड शहर त्यापासून बचावले होते. सुरूवातीच्या काळात शहरात सापडलेले बाधित लगेच करोनामुक्त झाले. त्यानंतर दीड ते दोन महिने शहरात कोठेही बाधित नव्हते. मात्र, जुलै महिन्यात बैलबाजार रोडवरील झोपडपट्टी परिसरात बाधित सापडला. तेथील लोकांच्या जागरूकतेमुळे करोनाची साखळी तयार झाली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनासही थोढेसे हायसे वाटले.
मात्र, जुलै महिन्याच्या दहा तारखेनंतर शहराच्या सर्व मध्यवतीं भागात बाधित वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने तसेच काहीजण त्रास होत असूनही भीतीपोट येत पुढे येत नसल्याने हा संसर्ग वाढतच चालला आहे.
पालिका प्रशासनाने सुरूवातीपासून करोनाचा कहर शहरात वाढू नये यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र, शहरातील प्रत्येक भागात जंतूनाशक फवारणीवर सातत्याने भर दिला जात होता. याशिवाय पालिकेचे काही पदाधिकारीही स्वत:हून याबाबत पुढाकार घेत असल्याचे दिसून येत होते. काहींनी तर स्वत: ट्रॅक्टर चालवत आपआपल्या भागात जंतूनाशक फवारणी केली होती.
पालिकेचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी आपल्या वाढदिवसाला खर्च न करता पालिकेस व शहरात काही ठिकाणी सॅनिटायझर मशिन भेट म्हणून दिल्या आहेत. शहराच्या लोकसंख्येचा विचार करता करोनाचा कहर सुरू झाल्यास तो घातक ठरू शकतो. याचा विचार करून नियोजन सुरूवातीपासूनच करण्यात आले आहे.
मात्र, लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात शिथीलता मिळाल्यानंतर आसपासच्या गावातील नागरिकांची शहरात गर्दी वाढू लागली आहे. त्याचाही परिणाम शहरात बाधितांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.
दरम्यान, दि. 1 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सुचनेनुसार जिल्हा अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळेही शहरात गर्दी आता नित्याचीच बनली आहे. यामुळे शहरातील बाधितांचा आकडा कमी होणे अवघड आहे. मंगळवार अखेर शहरातील बांधितांची संख्या 139 इतकी झाली होती. तर फक्त 27 जण करोनामुक्त झाले आहेत. अजूनही 102 नागरिक करोनाबाधित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तर दहाजण मृत झाले आहेत. शहरातील सर्व हॉस्पिटल्स सध्या फुल्ल आहेत. असून ही बाब गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार कराड शहरातील शनिवार पेठ येथील 44 वर्षीय पुरुष, 77 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील 64 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, येथील 35 वर्षीय महिला,
35, 30, 31, 28 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 63 वर्षीय पुरुष हे बाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती काढण्याचे काम पालिकेकडून सुरू असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
करोना संक्रमणाला जुलैपासून सुरूवात…
कराड शहरात जुलैपासून करोना संक्रमणाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. बाधितांची दररोज येणारी संख्या ही दहाच्या वर असल्याची दिसून येते. शहरातील एकही पेठ अथवा वाढीव भाग यापासून वाचलेली नाही. सध्य परिस्थितीत करोनाची साखळी तोडणे फारच अवघड होऊन बसले आहे. जुलै महिन्यातील स्थिती पाहतात. केवळ दहा ते पंधरा करोना बाधितांची असणारी संख्या शंभराहून अधिक झाली. तरीही नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसते.