संगमनेर -लॉकडाऊनमुळे राज्य तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. असे असतानाही मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या शिवडीतील एक तरुणी हातावर चक्क होम क्वॉरंटाईनचा शिक्का असतानाही केवळ आमदार महोदयांच्या पत्रावर खासगी वाहनाने मुंबईहून थेट संगमनेरात पोहोचली. तिला अटकाव करण्याऱ्या अधिकाऱ्यांशी तिने हुज्जत घातली.मात्र, संगमनेर प्रशासनाने तिला परत माघारी पाठविले.
मुंबईतून संगमनेरात आलेली ती तरुणी शहरातील त्या भागातून जरी गेली असली तरी, तरी ती निश्चित गावाबाहेरच गेली का? की गावातच कोठे वास्तव्यास थांबली आहे, याबाबत प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. गुरुवारी दुपारच्या सुमारास मुंबईचे एका खासगी वाहनातून एक तरुणी संगमनेरातील गजबजलेल्या ठिकाणी दाखल झाली. त्या एका आमदाराने लॉकडाऊनचे सगळे नियम धाब्यावर बसविले व स्वतःच्या स्वाक्षरीचे पत्र त्या महिलेला दिले. हे पत्र संबंधित महिलेला 23 एप्रिल रोजी मुंबई ते संगमनेर प्रवास करायचा आहे.
या प्रवासात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे पत्रात म्हटले आहे. पत्रामध्ये संबंधित महिलेचे नाव, गाडी क्रमांक व वाहन चालकाचे नाव नमूद करण्यात आले आहे. या पत्राच्या आधारे संबंधित तरुणीने मुंबई ते संगमनेर असा सुखरूप प्रवास सुद्धा पूर्ण केला. या प्रवासादरम्यान लॉकडाऊनमध्ये तिला कोणीच कसे अडविले नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र घरमालकाला ती कोठून आली याची कल्पना असल्याने त्यांनी तिला खोलीची चावी देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर त्या तरुणीने घरमालकाशी हुज्जत घालून त्याला दमबाजीही केली. त्या घरमालकाने हा प्रकार प्रशासनाला कळविल्यानंतर महसुल विभागाचा एक कर्मचारी त्या ठिकाणी हजर झाला.
त्याने त्या तरुणीला कॉटेज रुग्णालयात चालण्याची विनंती केली, मात्र तिने त्याच्यावरही तोंडसुख घेत आपल्या हातातील मुंबईचे आमदारांचे पत्र ओरडून ओरडून दाखविण्यास सुरुवात केली. त्या तरुणीच्या हातावरील होम क्वॉरंटाईनचा शिक्का सर्वांनी पहिल्याने त्या तरुणीला तेथे मोठा विरोध होवू लागला.
वावधन प्रकरण ताजे उदाहरण असताना आमदार महाशयांनी संबंधित तरुणीला पत्र कसे दिले? हा मात्र प्रश्नचिन्हच आहे. ती खरोखरीच शहराच्या, तालुक्याच्या बाहेर गेली की शहरातच कोणी तिला आश्रय दिला?त्या तरुणीबाबत यापेक्षा अधिक माहिती प्रशासनाकडेही उपलब्ध नाही.