बनीहाल – तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे गेले चार दिवस बंद असलेला जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज वाहतुकीला खुला करण्यात आला. रामबन जिल्ह्यात या महामार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे या महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
रस्त्यावर वाहून आलेल्या दरडी तसेच मातीचे ढिगारे दूर करण्याचे काम गेले तीन दिवस रात्रंदिवस सुरू होते. दलवास, पंथीयाल आणि आसपासच्या भागातील दरडी दूर करणे हे एक मोठे आव्हानात्मक काम होते. शुक्रवारी हवमानाच्या स्थितीत सुधारणा झाल्यानंतर दरडी दूर करण्याच्या कामाला वेग देण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी सध्या तेथे फक्त अडकून पडलेल्या वाहनांना पुढे जाण्यास अनुमती दिली आहे. जम्मू किंवा श्रीनगरहून जादाची वाहने या रस्त्यावरून जाण्यास अनुमती नाकारण्यात आली आहे.