सासवड – सासवड (ता. पुरंदर) येथील दडपण्यात येणाऱ्या दुहेरी खात्याकांड प्रकरणी तपास अधिकारी बदल्याने याप्रकरणाला कलाटणी मिळणार की प्रकरण पुन्हा गुंडळण्याचा प्रयत्न होणार हे येणारा काळच सांगेल.
या दुहेरी हत्याकांडाच्या संदर्भाने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी शनिवारी (दि. 4) सासवडला भेट देत तपासाची माहिती घेतली. दरम्यान तपासी अधिकारीच बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्याकडून तपास काढून उपविभागीय पोलीस अधिकारी भोर पुरंदर धनंजय जाधव हे यापुढे तपास करणार आहेत.
ज्या दोघांचा खून झाला होता त्या कचरा वेचकांची अजूनही ओळख पटली नाही. दरम्यान, तिसरी कचरा वेचक महिला शेवंताबाई जाधव यांना देखील मारहाण झाल्याने व त्या जखमी असल्याने उपचार घेत आहेत. यातील अंडाभुर्जी हातगाडी चालक व आरोपी निलेश उर्फ पप्पु जयवंत जगताप (रा.ताथेवाडी, सासवड ता.पुरंदर) यास दि. 30 मे रोजी रात्री उशिरा पोलीसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती.
त्याची पोलीस कोठडी शुक्रवारी (दि. 3) अखेर संपली. त्यामुळे पुन्हा न्यायालयात त्यास हजर केले असता, त्यास सोमवार (दि. 6) पर्यंत पुन्हा पोलीस कोठडी वाढविल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
या प्रकरणांमध्ये सुरुवातीचा तपास हा सहायक पोलीस फौजदार सुनील चिखले यांच्याकडे दिला. या प्रकरणाची तीव्रता वाढल्यानंतर सदरचा तपासा सदर चा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सुरू केला होता. व या नंतर शनिवारी पोलीस अधीक्षक यांच्या भेटीनंतर तपासा उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय जाधव यांनी स्वतः ताब्यात घेतला आहे.
“या प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत. त्याचबरोबर यापुढे विशेष तज्ञांकडे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणारा अहवाल तात्काळ पाठवला जाईल.”
– धनंजय जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी