डाव फसला! प्रतिष्ठित डॉक्टरच्या नावे केली 50 लाखांच्या लोनची मागणी अन्…

तुमच्याही नावे अशाप्रकारे गैरव्यवहार केला जाऊ शकतो...

नगर (प्रतिनिधी) – डॉक्टरचा ई-मेल, कागदपत्रे बनावट तयार केली. सीमकार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले. त्यावरून नगर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरच्या नावावर बजाज फायनान्सकडे 50 लाखांच्या लोनची मागणी केली. उलट तपासणीसाठी फायनान्सकडून फोन गेला पण डॉक्टरच्या नावाने बोलणारा आरोपी गडबला आणि तिथंच डाव फसला. फायनान्सच्या अधिकार्‍याने डॉक्टरच्या जुन्या क्रमांकावर फोन केला आणि फसवणुकीचा सगळा प्रकार घडकीस आला.

करोना पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाउन झाले. त्यामुळे अनेकाचे छोटे-मोठे धंदे धोक्यात आले होते. काहीच्या प्रशिक्षण संस्था बंदही पडल्या. हातचा रोजगार गेल्याने अनेकजण अडचणीत आले. त्याच प्रकारातून नगर आणि औरंगाबादमधील तरुणांनी स्वत:ची प्रशिक्षण संस्था बंद पडल्याने पैसे मिळविण्याची नामी शक्कल लढविली. नगरमधील एका प्रथितयश डॉक्टरचा बनावट ई-मेल तयार केला आणि बनावट कागदपत्रेही तयार केली. त्या कागदपत्रांच्या आधारे डॉक्टराच्या नावे सीमकार्ड खरेदी केले. ते सीमकार्ड व कागदपत्राचा वापर करून बजाज फायनान्सकडे 50 लाख लोनची मागणी केली.

नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी. स्व: साक्षांकित करताना त्यावर कारण आणि दिनांक टाकावा. जेणेकरून ते लक्षात राहील. आपल्या कागदपत्रांचा कोणी गैरवापर करणार नाही याची दक्षता घ्यावी.
– मधुकर साळवे, पोलीस निरीक्षक सायबर पोलिस ठाणे

ही घटना 23 जानेवारी रोजी घडली. फायनान्सची ही फाईल औरंगाबाद शाखेत होती. आरोपींनी फायनान्सलाही बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या सीमकार्डचा नंबर दिला होता. मात्र, फायनान्सच्या औरंगाबाद शाखेतील एका अधिकार्‍याने चौकशीकामी डॉक्टरच्या दुसर्‍या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. डॉक्टरच्या नावाने बोलणारा आरोपी गडबडला. त्यामुळे फायनान्सच्या अधिकार्‍याला शंका आली. त्याने डॉक्टरचा जुना क्रमांक शोधून फोन केला.

त्यावेळी डॉक्टर म्हणाले, की मी अशी लोनची मागणी केली नाही. त्यामुळे बजाज फायनान्सचे अधिकारीही चक्रावून गेले.त्यानंतर सगळा प्रकार घडकीस आला. डॉक्टरांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून नगर व औरंगाबाद येथील चार जणांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. डॉक्टरांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.