तामिळनाडुने भाजपला धडा शिकवावा – राहुल गांधी

नागकरकॉईल – भारतीय जनता पक्षाने वन नेशन, वन कल्चर, वन हिस्टरीचा नारा दिला आहे. त्यांची ही भूमिका तामिळींच्या स्वतंत्र संस्कृती, भाषा आणि इतिहासाला बाधा आणणारी आहे. त्यामुळे तामिळनाडुने भाजपला धडा शिकवावा आणि त्यांना सत्तेवरून घालवून द्यायचे एक उदाहरण येथे घालून द्यावे असे आवाहन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. ते तीन दिवसांच्या तामिळनाडुच्या दौऱ्यावर आले असून आज येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले की तामिळी लोकांशिवाय तामिळनाडूत अन्य कोणाची सत्ता चालत नाहीं. या निवडणुकीतही हेच दिसून येईल आणि जे लोक खऱ्या अर्थाने तामिळींचे नेतृत्व करतात तेच लोक येथे राज्य करतील असे ते म्हणाले. मोदींच्या पुढे गुढघे टेकणारे विद्यमान मुख्यमंत्री हे तामिळींचे प्रतिनिधीत्व करू शकत नाहीत. त्यांनी मोदींऐवजी येथील जनतेपुढे मान तुकवायला पाहिजे असे प्रतिपादनहीं त्यांनी केले.

मोदी आणि संघ परिवाराने तामिळी संस्कृतीची अवमान केला आहे असा आरोप करून ते म्हणाले की, अशा लोकांना येथे थारा मिळता कामा नये. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी हे मोदींच्या सुचनेनुसारच राज्यकारभार करीत आहेत. त्यांना येथील जनतेच्या इच्छेचा विसर पडला आहे असा आरोपही त्यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.