पुणे – करोनाच्या संकटानंतर अखेर नऊ महिन्यांनंतर शहरातील शाळा सोमवारी सुरू झाल्या. पहिल्या दिवशी 66 शाळा सुरू होणार होत्या. पण, शिक्षकांच्या करोना चाचणीस दिरंगाई, संमतीपत्रांची संख्या कमी असल्याने महापालिकेची परवानगी मिळूनही अनेक शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. महापालिकेच्या 44 पैकी 22 शाळा आज सुरू झाल्या आहेत. तसेच, खासगी संस्था सद्यस्थितीचा परिस्थितीचा विचार करत पुढील तीन-चार दिवसांत शाळा सुरू करणार असल्याचे दिसून येत आहे.
महापालिका प्रशासनाने आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शहरात 529 उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यातील खासगी 22 आणि महापालिकेच्या 44 अशा 66 शाळा सुरू होतील, असे प्रशासनातर्फे स्पष्ट केले होते. मात्र यापैकी अनेक शाळा पहिल्या दिवशी सुरूच झाल्या नाहीत.
महापालिकेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी शिवाजी दौंडकर म्हणाले, “मनपाच्या 44 शाळांपैकी 22 शाळा सामाजिक संस्थांद्वारे चालविल्या जातात. त्या मंगळवारपासून सुरू होणार आहेत. तर मनपा प्रशासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या 24 पैकी 22 शाळा आज सुरू झाल्या. त्यामध्ये इयत्ता नववीचे 136, दहावीचे 226 आणि बारावीचे 32 असे एकूण 394 विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, महापालिकेने सद्यस्थितीत 232 शाळांची तपासणी करून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्णता केलेल्या 22 शाळांना परवानगी दिली. पण, अद्याप संमतिपत्रांची संख्या कमी असल्याने शाळा सुरू करण्यास आणखी तीन चार दिवस वाट प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने काही शाळांना परवानगी दिली असली तरी सर्व शिक्षकांचे करोना चाचणीचे अहवाल आल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात, अशी अट टाकल्याने या शाळा सुरू झालेल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिकेने यापूर्वी 232 शाळांची तपासणी केली होती. त्यात सोमवार दुपारपर्यंत आणखी 150 शाळांची भर पडली आहे. त्यापैकी एकूण 82 खासगी शाळांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा त्यांच्या स्तरावर नियोजन करून व नियमांचे पालन करून शाळा सुरू करतील
– सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त, मनपा