मुंबई – रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची आज अचानक बैठक होऊन व्याजदरात 0.40 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शेअर बाजारात तुफान विक्री होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,306 अंकांनी म्हणजे दोन 2.29 टक्क्यांनी कोसळून 55,669 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 391 अंकांनी म्हणजे 2.29 टक्क्यांनी कोसळून 16,677 अंकांवर बंद झाला.
रिझर्व्ह बॅंकेने केवळ रेपो दरात वाढ केली नाही तर रोख राखीव प्रमाण अर्धा टक्क्यांनी वाढऊन भांडवल बाजारातील 87 हजार कोटी रुपयाची रक्कम काढून घेतली आहे. त्यामुळे भांडवल सुलभता कमी होणार असल्यामुळे गुंतवणूकदारानी विक्री केल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे मुख्य गुंतवणूक अधिकारी व्ही के विजयकुमार म्हणाले की रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणार हे सर्वांना माहीत होते. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने आज अचानक बैठक घेऊन लगेच व्याजदर वाढीची घोषणा केली. विशेष म्हणजे भारतीय विमा महामंडळाचा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आजपासून उपलब्ध झाला असतानाच रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढीची घोषणा केली आहे. याबद्दल काही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
आजच्या विक्रीत टायटन, बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, इंडसइंड बॅंक, एचडीएफसी बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, मारुती, डॉक्टर रेड्डीज, या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. मात्र अशा परिस्थितीतही केवळ पावर ग्रिड, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बॅंकेच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ होऊ शकली.
अमेरिकेतील व्याजदर वाढ आणि रशिया- युक्रेन युध्दामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारात विक्री करण्याचा सपाटा चालूच असून सोमवारी या गुंतवणूकदारांनी 1,853 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
………