नवी दिल्ली – दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचा दर 134 रुपयांनी कमी होऊन 50,601 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 169 रुपयानी कमी होऊन 62,787 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सकाळच्या सत्रामध्ये रुपयाचे मूल्य आठ पैशांनी वाढले होते. या घडामोडीचा सोने आणि चांदीच्या दरावर काही प्रमाणात परिणाम झाला. डॉलर बळकट होत आहे त्याचबरोबर काही तासातच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतातील सोने आणि चांदीच्या दरावर झाला असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,869 डॉलर व चांदीचा दर 22. 61 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.